पिंपरी : जुनी सांगवी येथे मुळा नदीपात्रातील जलपर्णी काढण्यास टाळाटाळ करणाऱ्या ठेकेदाराला चार दिवसात दोन वेळा नोटीस बजावली आहे. येत्या सात दिवसात जलपर्णी न काढल्यास कायदेशीर कारवाई करण्याची ताकीद आरोग्य विभागातर्फे दिली आहे, अशी माहिती माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी दिली. पिंपरी - चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. पवना नदीचे पात्र २४ , इंद्रायणीचे १९ आणि मुळा नदीचे १० किलोमीटर आहे. मुळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी निर्माण झाली आहे. त्यामुळे सांगवी, बोपखेल, वाकड, कस्पटेवस्ती परिसरात डासांचा प्रादुर्भाव आहे. नदीपात्रात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचते. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील रहिवशांना डास व दुगंधीर्चा सामना करावा लागत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने नदीपात्राची पाहणी केली. त्यावेळी ठेकेदारामार्फत नदीपात्रातील जलपर्णी काढली जात नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजाविली. तसेच सात दिवसात जलपर्णी काढण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. मुळा नदीतील जलपर्णी काढण्याची १९ लाखांची निविदा आहे. जुनपर्यंत त्याची मुदत आहे. ठेकेदार पाऊस पडण्याची वाट बघतात. पाऊस पडल्यावर जलपर्णी वाहून जाते. जलपर्णी न काढता फुकटचे पैसे घेतात. त्यामुळे पावसाळ्या अगोदर संपूर्ण जलपर्णी काढण्यात येणार आहे''- डॉ. अनिल रॉय (आरोग्य वैद्यकीय अधिकारी )
जलपर्णी काढण्यास टाळाटाळ करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 4:01 PM
पिंपरी - चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात.
ठळक मुद्दे मुळा नदीतील जलपर्णी काढण्याची १९ लाखांची निविदा; जुनपर्यंत त्याची मुदत महापालिकेच्या आरोग्य विभागाने नदीपात्राची केली पाहणी