पिंपरी : सोन्याचा शर्ट तयार करून घेतल्याने ‘गोल्डमॅन’ म्हणून चर्चेत आलेल्या दत्ता फुगे याला भोसरी पोलिसांनी तडीपारीची नोटीस दिली आहे, अशी माहिती भोसरी पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी फायनान्स संस्था सुरू करून गुंतवणूकदारांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रारी दाखल आहेत. भागवत चाटे यांच्या फिर्यादीनुसार फुगे याच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात १३ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा यापूर्वीच दाखल झालेला आहे. खासगी फायनान्स कंपनीत पैसे गुंतविण्यास सांगून त्यांना जादा रकमेचा परतावा देण्याचे आमिष दाखविले.याप्रकरणी फुगेविरुद्ध खडकी पोलिसांकडे मार्च २०१५ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्या जावयाने केलेल्या गोळीबार घटनेची पोलिसांकडून चौकशी झाली होती. आर्थिक फसवणुकीसह अन्य स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यामुळे पोलिसांनी फुगे याच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार केला आहे. याबाबत पुढील कार्यवाही सुरू असून, फुगे याला नोटीस बजावल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गोल्डमॅन फुगेला तडीपारीची नोटीस
By admin | Published: December 01, 2015 3:41 AM