विजय सुराणा वडगाव मावळ
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाची हद्द आणखी वाढून आता त्यात थेट लोणावळा शहर आणि ग्रामीण चा देखील समावेश होण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलिस महासंचालकांना या बाबत प्रस्ताव पाठविला होता.या प्रस्तावावर संबंधिताकडून तात्काळ अभिप्राय मागवला आहे.
पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डाॅ.अभिनव देशमुख यांना संबंधित पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ग्रामपंचायतीकडून या संर्दभात अभिप्राय घेण्यास सांगितले आहे. तसेच ग्रामसभेतील ठराव व त्यावरील ग्रामसभेचा निर्णय संबंधीत ग्रामपंचायतीकडून प्राप्त करून कार्यालयात त्वरीत सादर करावा असे निर्देश दिले आहेत.
सध्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तलायात पिंपरी चिंचवड, निगडी, सांगवी, वाकड, भोसरी, भोसरी एमआयडीसी, चिखली, तसेच पुणे ग्रामीण मधील चाकण, आळंदी, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी व देहूरोड या पोलिस ठाण्याचा समावेश आहे
पुणे ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीत ओतूर, आळेफाटा, जुन्नर, नारायणगाव, मंचर, घोडेगाव, खेड, शिरूर, रांजणगाव, शिक्रापूर, इंदापूर, वालचंद नगर,भिगवण, दौंड, येवत, बारामती शहर, बारामती तालुका, जेजूरी, सासवड, भोर, राजगड, वेल्हा, पौंड,वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण या पोलिस स्टेशनचा समावेश आहे.
ग्रामीणचे महत्व कमी होणार?
पुणे ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतील या पूर्वी चाकण, आळंदी, तळेगाव दाभाडे , तळेगाव एमआयडीसी व देहूरोड या पाच पोलिस स्टेशनचा पिंपरी चिंचवड आयुक्तलायत समावेश झाला आहे. नव्याने वडगाव, कामशेत, लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण या पोलिस स्टेशनचा प्रस्ताव मंजूर झाल्यास पुणे ग्रामीण पोलिस कार्यालयाचे अधिकार क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.