- विश्वास मोरेपिंपरी : पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतून जाणा-या पुणे-मुंबई महामार्गावर पार्किंग व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. ग्रेड सेपरेटर, बीआरटी, मेट्रो अशा तीन लेन काही दिवसांत सुरू होणार आहेत. त्यामुळे चार लेनमधील शेवटच्या लेनला कमी जागा मिळणार आहे. त्यामुळे त्यातच या मार्गावर रस्त्यातच बेकायदा पार्किंग करणा-यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नो पार्किंग झोन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. स्मार्ट वाहतुकीसाठी शहरातील महामार्गावर नो पार्किंग झोन असणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे. त्यामुळे शहरातील स्मार्ट वाहतूक, स्मार्ट सिग्नल यंत्रणा, मलनिस्सारण, कचरा विलगीकरण, सिग्नल फ्री वाहतूक यंत्रणा आणि प्रक्रिया या विषयी स्मार्ट असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम करीत असताना महामार्गावरील वाहतुकीवर ताण येणार नाही, या दृष्टीने उपाययोजना करण्यात येणार आहेत. स्मार्ट वाहतुकीसाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील महामार्गावर नो पार्किंग झोन असेल.ही आहेत वाहतूककोेंडीची ठिकाणेमहामार्गावर दापोडी ते निगडी आणि निगडी ते दापोडी या मार्गावर पार्किंगचे नियोजन केलेले नाही. तसेच पार्किंगचे दिवसही ठरविण्यात आलेले नाही. पार्किंगची ठिकाणे सोडून वाहने उभी केली जातात. कासारवाडी फाट्यावरून पिंपरीला येणारा रस्ता, पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापूर्वी आणि बँक आॅफ इंडिया परिसर, कमला आर्केड, बिगबझार समोर, चिंचवड स्टेशन, आकुर्डीतील खंडोबामाळ चौकापासून निगडी उड्डाणपुलापर्यंत वाहने मोठ्या प्रमाणावर उभी केली जातात. निगडीतून पुण्याला जाताना खंडोबामाळ चौक ते काळभोरनगर, महावीर चौक, चिंचवड स्टेशन चौक पुढे मोरवाडी, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौक ते एच कॉलनी, नाशिकफाटा ते फुगेवाडीपर्यंतच्या रस्त्यावर वाहने लावली जातात.निविदा प्रक्रिया सुरूनो पार्किंगमधील वाहने उचलण्यासाठी टोर्इंगसाठी प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहने उचलून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्या संदर्भातील निविदा प्रक्रिया महापालिका प्रशासनाने सुरू केलेली आहे.आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘मुख्य मार्गावर वाहतुकीला अडथळा होणार नाही़ याबाबत दक्षता घेणे काळाची गरज आहे. त्यामुळे पुण्याप्रमाणेच धोरण आपण आणत आहोत. निविदा प्रक्रिया सुरू आहे. व्यावसायिक संकुलांनी त्यांच्या आवारातच वाहने उभी करणे गरजेचे आहे. त्यामुळे स्मार्ट वाहतूक होण्यास मदत होणार आहे. तसेच महापालिकेच्या मोकळ्या जागांवरही पार्किंगची व्यवस्था करणार आहे.’’स्थायी समिती सभापती सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘महामार्गावरील सार्वजनिक वाहतूक हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नो-पार्किंग झोन करीत असताना नागरिकांच्या वाहनांसाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. आय टू आर अंतर्गत आपल्याला मिळालेल्या जागांचा वापर यासाठी करता येणार आहे.’’कारवाई पिंपरी अन् चिंचवडलाच!महामार्गावर अस्ताव्यस्त वाहने लावणाºयांवर कारवाई फक्त पिंपरी आणि चिंचवडलाच केली जाते. कायद्याच्या नावाखाली वाहनचालकांकडून लूट केली जात आहे. दुचाकी वाहनांवरच कारवाई होते. काही वाहने सेटलमेंट करून सोडून दिली जातात. चारचाकी वाहने उचलण्यासाठी वाहतूकशाखेकडे प्रभावी यंत्रणा नाही. ही प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज आहे. सर्वाधिक पार्किंगचा प्रश्न पिंपरी आणि चिंचवडमध्येच आहे. तसेच पार्किंगची वाहने उचलून चांगल्या पद्धतीने नेली जात नाही, अशी तक्रार वाहन चालकांकडून केली जात आहे.सिग्नल फ्री चौकस्मार्ट सिटीसंदर्भात स्वीडन येथे झालेल्या प्रशिक्षणात आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सहभाग घेतला. त्या वेळी स्मार्ट सिटीतील उपाययोजनांची माहिती घेतली. स्मार्ट वाहतूक सेवा कशी राबविली आहे. त्यांची आव्हाने काय आहेत, त्यावर उपाययोजनांची माहिती घेतली. सिग्लन फ्री चौक आणि नो-पार्किंग झोन राबविल्यास चौकांच्या परिसरात असणारी कोंडी कमी होणार आहे. शहरातील पुणे-मुंबई हा मार्ग महत्त्वाचा मार्ग आहे. मेट्रो, बीआरटी सुरू झाल्यानंतर वाहतुकीवर ताण येऊ नये म्हणून उपाययोजना करण्याचे धोरण महापालिकेने अवलंबिले आहे.पार्किंगची व्यवस्था करणार?महामार्गावर नो-पार्किंग झोन केल्यास पार्किंगची व्यवस्था करण्याचे आव्हान असणार आहे. त्यासाठी पिंपरी, वल्लभनगर, चिंचवड, निगडीमध्ये पार्किंगसाठी आरक्षित असणा-या भूखंडांचा वापर केला जाणार आहे. सुरुवातीला हॉटेल जिंजर येथील मोकळा भूखंड, कत्तलखान्यासाठी आरक्षित जागा, पिंपळे पेट्रोल पंपाजवळील मोकळ्या जागेचा वापर करण्यात येणार आहे. आय टू आर अंतर्गत मिळालेल्या जागांचा वापर करता येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना पार्किंगची व्यवस्था उपलब्ध होणार आहे. यासंदर्भातील धोरण स्थायी समितीने तयार करण्यास प्रशासनास सूचना दिल्या आहेत. पार्किंगची व्यवस्था झाल्यानंतर हा रस्ता नो-पार्किंग झोन म्हणून कार्यरत होणार आहे.
महामार्गावर आता ‘नो पार्किंग झोन’, महापालिकेचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 3:08 AM