कोरेगाव भीमा - शिरूर मतदारसंघाला अभिनेत्याची गरज नसून लोकांची सुख-दु:खे जाणून घेणाऱ्याची गरज असून अशा वेळी सेलिब्रेटीपेक्षा सर्वसामान्य जनतेतला माणूस देण्याची आवश्यकता होती; मात्र तसे न झाल्याने आता निवडणूक सोपी झाली असून शिरूरची जनता सुज्ञ असून त्यांना नेता, अभिनेता की आपल्या घरातला खासदार हवाय, हे जनतेला माहीत असल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी सांगितले.खासदार शिवाजीराव आढळराव यांनी आपल्या पक्षातील आमदार व पदाधिकाऱ्यांसह शिवनेरी ते वढू बुद्रुक विजय निर्धारयात्रा काढली होती. यावेळी वढू येथे ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासह आमदार सुरेश गोरे, आमदार शरद सोनवणे, जिल्हाप्रमुख राम गावडे, जिल्हा उपप्रमुख अनिल काशीद, जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा, अरुण गिरे आदींसह प्रमुख पदाधिकारी व मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजीमहाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर या विजय निर्धारयात्रेचे कोरेगाव भीमा येथे जिल्हा उपप्रमुख अनिल काशीद, सरपंच संगीता कांबळे, केशवराव फडतरे, विवेक ढेरंगे, सुनील सव्वाशे यांनी स्वागत केले. त्यानंतर तुळापूर येथील संभाजीमहाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आल्यानंतर भोसरीकडे यात्रा रवाना झाली.यावेळी आढळराव म्हणाले, पै. मंगलदास बांदल गेले वर्षभर या मतदारसंघात काम करीत होते. मात्र राष्ट्रवादीने अभिनेते अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिल्याने मला ही निवडणूक अधिक सोपी झाली असल्याचे त्यांनी सांगितले.अमोल कोल्हे स्क्रीप्ट येतील तसे ते बोलतात...अमोल कोल्हे यांना ज्याप्रमाणे स्क्रीप्ट येतील तसे ते बोलतील त्यामुळे ते टप्प्याटप्प्याने काय बोलतील ते मला माहित नाही, पण आम्ही जे बोलतो ते मनापासून बोलतो, आम्ही टप्पे-दुटप्पे मनात ठेवत नाही, असा टोमणा अमोल कोल्हे यांना खासदार शिवाजीराव आढळराव यांनी लगावला.आशा बुचके यात्रेत दिसल्या नाहीत...शिवसेनेची विजय निर्धारयात्रा शिवनेरी ते वढू बुद्रुक या ठिकाणी काढण्यात आली. यावेळी वढू येथे संभाजीमहाराजांच्या समाधीस्थळी खासदार आढळराव यांच्यासह आमदार सुरेश गोरे व मनसेतून नुकतेच शिवसेनेत आलेले आमदार शरद सोनवणे यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते, मात्र जिल्हा परिषदेचा गटनेत्या आशा बुचके या निर्धार रॅलीमध्ये दिसत नसल्याने अनेक कार्यकर्ते कुजबुज करीत होते.
आता शिरूरची निवडणूक सोपी - शिवाजीराव आढळराव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 12:44 AM