पिंपरी : महापालिकेने विकसित केलेल्या किवळे-सांगवी व किवळेतील मुकाई चौक ते निगडीतील भक्ती शक्ती चौक या विकसित होत असलेल्या दोन्ही बीआरटी रस्त्यांना जोडणारा फिडर रस्ता रावेत-शिंदे वस्ती भागातून विकसित करण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक सुरळीत होणार आहे. रस्ता शिंदे वस्ती (रावेत) येथील एमआयडीसी जलवाहिनीशेजारून होणार असून, लांबी १८०० मीटर व रुंदी १३ मीटर असणार आहे. ठेकेदारास कामाचे आदेश दिले असून, तीन-चार दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. कामासाठी अंदाजपत्रकीय दरापेक्षा १२.२० टक्के कमी दराची ११ कोटी १८ लाख ३६ हजार ६९२ रुपयांची निविदा मंजूर झाली आहे. कामासाठी नऊ महिन्यांची मुदत आहे. जलवाहिन्या स्थलांतरित न करता पदपथ विकसित करण्याचे नियोजन असून, खांब उभारून वॉकिंग प्लाझा तयार करण्यात येणार आहे. हा रस्ता एमआयडीसीच्या ताब्यात असून, लोकवस्तीच्या भागातील ७.५० मीटर रुंद रस्त्याचे डांबरीकरण महापालिकेने केले आहे. मालकी एमआयडीसी कडेच ठेवून पालिकेस काम करण्यास परवानगी मिळण्यासाठी पत्राद्वारे विनंती केली आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, तीन-चार दिवसांत परवानगी मिळणार असल्याचे नगरसेविका संगीता भोंडवे यांनी सांगितले. रस्ता विकासासाठी तत्कालीन आयुक्तांनी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्यासह स्थळपाहणी केली होती. (वार्ताहर)रस्ता शिंदे वस्ती भागातून होणार असल्याने या भागातील प्रवाशांना सार्वजनिक परिवहन सेवा नजीकच उपलब्ध होणार आहे. इतरांनाही जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. - संगीता भोंडवे, नगरसेविका ४ रावेत, शिंदे वस्ती व प्राधिकरण परिसरातील नागरिकांचा वेळ वाचणार असून, वाहनांच्या इंधनाची बचत होईल. रावेत येथील भोंडवे कॉर्नर ते आकुर्डी रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत. वॉकिंग प्लाझामुळे रस्त्याच्या व रावेत शिंदे वस्तीच्या सौंदर्यात भर पडणार आहे. वाहतूक सुरळीत झाल्यामुळे वेळ वाचेल व प्रदूषण कमी होईल. रावेत पंप हाऊस चौकातील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल .
आता वाहतूक होणार सुरळीत
By admin | Published: October 06, 2016 2:50 AM