पिंपरी : कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केलेल्या अनिता रवींद्र सावळे यांच्याबद्दल फेसबुकवर एकाने आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यामुळे चळवळीतील कार्यकर्त्यांनी पोलिसांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आक्षेपार्ह पोस्टमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी सावळे यांनी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांच्याविरोधात फिर्याद दिली. त्यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा शिक्रापूरला वर्ग करण्यात आला आहे. एकबोटे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, तर भिडे यांच्या अटकेची मागणी होत आहे. सावळे यांच्याबद्दल पिंपरीतील तरुणाने फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. काही वेळाने ती काढूनही टाकली. मात्र, त्याची दखल घेत शनिवारी रात्रीच कार्यकर्त्यांनी पिंपरी पोलीस ठाणे गाठले.सावळे यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी करणारे निवेदन भारिप बहुजन महासंघाने परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांना दिले आहे.
एकबोटेविरोधात फिर्याद देणाऱ्या महिलेविषयी आक्षेपार्ह पोस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 4:54 AM