पिंपरी : विरोधी पक्ष नेत्यासाठी महापालिकेत असलेले पूर्वीचे दालन अपुरे पडत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने ते कार्यालय स्वीकारण्यास नकार देऊन नवीन प्रशस्त दालन मिळावे, अशी आग्रही भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांना दुसºया मजल्यावर दालन देण्यास सत्ताधारी भाजपाने संमती दिली.हा पर्याय राष्ट्रवादीने स्वीकारला नाही. अपेक्षेप्रमाणे पर्यायी जागा उपलब्ध झाली नाही. नवीन दालन मिळण्याची आशा मावळली. त्यामुळे नाईलाजास्तव तब्बल पाच महिन्यानंतर शुक्रवारी योगेश बहल यांनी जुन्याच ठिकाणी असलेल्या दालनात विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर बसून कामकाजास प्रारंभ केला.फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला आणि भाजपच्या हातात सूत्रे आली. पिंपरी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६ नगरसेवक निवडून आले. दुसºया क्रमांकाचे संख्याबळ असल्याने राष्ट्रवादीला विरोधी पक्षनेतेपदाचे कार्यालय देण्यात आले. मात्र, हे कार्यालय छोटे असल्याने ते स्वीकारण्यास राष्ट्रवादीने नकार दिला.पूर्वी विरोधी पक्षनेत्याचे कार्यालय महापालिका मुख्यालयाच्या तिसºया मजल्यावर होते. सध्याचे उपमहापौर व पक्षनेते यांचे कार्यालय तसेच नगरसचिवांचे कार्यालय असे पर्यायी जागांचे पर्याय देण्यात आले, त्यावर चर्चा झाली. परंतु, भाजपने उपमहापौर व पक्षनेत्यांचे कार्यालय विरोधी पक्षनेत्यांना देण्यास स्पष्ट नकार दिला. प्रशस्त दालन मिळावे, यासाठी राष्ट्रवादीचे नेते आग्रही होते.गेल्या काही महिन्यांपासून विरोधी पक्षनेत्यांनी बाहेरुन कामकाज करुन प्रशस्त कार्यालयासाठी सत्ताधाºयांकडे पाठपुरावा केला. परंतु, कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. उलट प्रस्तावित कार्यालय दुसºया समितीला देण्यात आल्यामुळे जुन्याच कार्यालयाचा ताबा घ्यावा लागला.प्रस्तावित कार्यालय जैवविविधता समितीलादुसºया मजल्यावर राष्ट्रवादीसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यास भाजपाने अनुकूलता दर्शवली. मात्र, राष्ट्रवादीने त्यास नकार दिला. त्यामुळे जैवविविधता समितीच्या अध्यक्षांसाठी ते दालन देण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादीला अखेर नाइलाजास्तव पूर्वीच्या दालनाचा ताबा घेणे भाग पडले. पाच महिने होऊनही योगेश बहल विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर बसले नव्हते. दुसरे कार्यालय मिळण्याची आशा मावळल्याने ते अखेर शुक्रवारी विरोधी पक्षनेत्याच्या जुन्याच दालनातील खुर्चीवर बसले.
विरोधी पक्षनेत्याला कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 4:40 AM