पिंपरी : प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण अधिकाऱ्यांना केलेल्या सूचनांची दखल न घेतल्याने आमदार लक्ष्मण जगताप यांनी नुकताच जाब विचारला. अधिकाऱ्यांनी केवळ कागदी घोडे नाचवू नयेत, काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विचारलेल्या प्रश्नांवर अधिकारी निरुत्तर झाल्याने अध्यक्ष व विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्याकडे प्रलंबित प्रश्न मांडू, असे सांगून आमदारांनी बैठक संपविली.आकुर्डी येथील प्राधिकरणाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांची जगताप यांनी बैठक घेतली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव, भाजपा नेते सारंग कामतेकर, नगरसेविका सीमा सावळे, राज्य माथाडी कामगार महामंडळाचे सदस्य अनुप मोरे, माजी नगरसेवक राजेंद्र साळुंके, सुरेश वाडकर, नामदेव ढाके आदी उपस्थित होते. प्राधिकरणातील साडेबारा टक्के जमीन परतावा, आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र, मागासवर्गीयांना सदनिका, गाळे व भूखंडांचे वाटप, उपलब्ध जमिनींचा विकास, प्राधिकरण हद्दीतील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी प्राधिकरणाच्या ‘ले आऊट’ची पुनर्रचना, विविध आरक्षणांचा विकास, प्राधिकरणाच्या जागेवर झालेली अतिक्रमणे याविषयी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात अशी दोन वेळा आढावा बैठक घेतली होती. अधिकाऱ्यांना लेखी सूचनाही केल्या होत्या. मात्र, कार्यवाही न झाल्याने सहा महिन्यांनंतर त्यांनी पुन्हा अधिकाऱ्यांची नुकतीच आढावा बैठक घेतली. या वेळी काही अधिकाऱ्यांकडून नागरिकांना चांगली वागणूक मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. वाकड येथील २७ सदनिकांचे आरक्षण धोरणानुसार मागासवर्गीयांना वाटप करण्यासाठी प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी घेऊन त्याची दोन महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन जाधव यांनी दिले. (प्रतिनिधी)
अधिकारी नाचवताहेत कागदी घोडे
By admin | Published: September 03, 2015 3:16 AM