पिंपरी : भक्ती-शक्ती उड्डाणपुलाखालील पीएमपी डेपोकडे जाणाऱ्या रस्त्यावर पीएमपी बसमधून ऑइल सांडले. त्यामुळे या रस्त्यावर दुचाकी घसरून अपघात होत होते. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाचे चार कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा फवारा मारून रस्ता धुऊन काढला. मात्र, वाहतुकीमुळे त्यांच्या कामात अडथळा येत होता.
भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपुलाखाली वाहनांची मोठी गर्दी असते. बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पीएमपीच्या बसमधून ऑइल गळती होऊन ही बस उड्डाणपुलाखाली बंद पडली. ऑइलमुळे रस्ता निसरडा झाला होता. तीन दुचाकी घसरून अपघात झाला. या परिसरात राहणारे सजग नागरिक वीरेंद्र गणेशवाणी यांनी अग्निशमन दलाला याविषयी वर्दी दिली. अवघ्या काही वेळेत अग्निशमनची गाडी तेथे पोहोचली. मात्र, संध्याकाळची वेळ असल्याने या रस्त्यावर प्रचंड वाहनांची गर्दी झाली होती. त्यामुळे रस्ता धुताना अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांना अडथळा येत होता. तसेच तेथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
उड्डाणपुलाखाली तीन दुचाकीस्वार एकापाठोपाठ येऊन घसरून पडले. त्यामुळे रस्त्यावर येऊन पाहिले असता तेथे ऑइल सांडल्याचे दिसून आले. तात्काळ अग्निशमन दलाला माहिती कळविली. अवघ्या काही वेळेत अग्निशमनचे कर्मचारी येथे पोहोचले. मात्र, वाहतुकीमुळे त्यांना रस्ता स्वच्छ करण्यात अडचण येत होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांनाही घटनास्थळी येण्याची विनंती केली.
- विजेंद्र गणेशवाणी, सजग नागरिक
रस्त्यावर ऑइल सांडल्याची वर्दी मिळताच तातडीने भक्ती-शक्ती चौकात आलो. अग्निशमनच्या चार कर्मचाऱ्यांनी मिळून रस्ता धुऊन काढला. मात्र, सायंकाळची वेळ असल्याने वाहतूक जास्त होती. त्यामुळे कामात अडथळा येत होता. मात्र, कर्मचाऱ्यांनी संपूर्ण रस्ता धुऊन रस्त्यावर पडलेले ऑइल साफ केले.
- सोमनाथ तुकदेव, फायरमन, अग्निशमन दल, पिंपरी-चिंचवड