विश्वास मोरे/ पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील प्राधिकरण भेळ चौक आणि चऱ्होली रस्ता अशा दोन ठिकाणी रविवारी दुपारी ऑइल सांडले होते. त्यामुळे अनेक गाड्या घासून पडल्या. अग्निशामक दलाच्या पथकाने दोन्ही ठिकाणचे रस्त्यावरील ऑइल स्वच्छ केले आहे. त्यामुळे अपघाताचा धोका टाळला आहे.
पुणे आळंदी रस्त्यावर वडमुख वाडी पासून अलंकापुरम्पर्यंत एका डंपर मधून ऑइल सांडले होते. सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत ऑइल सांडले होते. याबाबत नागरिकांनी अग्निशामक दलाच्या पथकास फोन करून माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच घटनास्थळी अग्निशामक दलाचे पथक आले. तोपर्यंत काही दुचाकी घसरून पडल्या होत्या. वाहन चालक किरकोळ जखमी झाले होते. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे दोन किलोमीटरच्या रस्त्यावर जिथे जिथे ऑइल सांडले आहे. त्या ठिकाणी माती टाकली. पाण्याद्वारे रस्ता स्वच्छ केला. त्यामुळे धोका टाळला.भेळ चौकातही ऑइल सांडले
प्राधिकरण परिसरातील भेळ चौकातही एका वाहनांमधून रस्त्यावर ऑइल सांडल्याचे आढळून आल्यानंतर अग्निशामक दलाच्या पथक घटनास्थळी दाखल झाले. त्या ठिकाणी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ज्या ठिकाणी ऑइल सांडले आहे तेथील वाहतुकीबाबत मार्गदर्शन करत होते. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन रस्ता स्वच्छ केला. पाण्याच्या फवाऱ्याद्वारे ज्या ठिकाणी ऑइल सांडले आहे. तेथील रस्ता स्वच्छ केला, अशी माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख ऋषीषीकांत चिपाडे यांनी दिली.