दिघी : महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवक आणि महापौरांनी पालिकेच्या कारभाराची सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत. नवीन सत्ताधा-यांनी कारभारास सुरुवात केली असली, तरी पालिका प्रशासनाच्या भोसरीतील ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयातील माजी नगरसेवकांच्या नावाचा फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. या जुन्या फलकावरून प्रशासनाच्या उदासीनतेची कार्यालयात चांगलीच चर्चा रंगत आहे. ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच पालिकेचा नगरसेवकांच्या प्रभाग व नावांचा फलक झळकत आहे. विजयी झालेल्या उमेदवारांना प्रशासनाकडून प्रमाणपत्र देऊन नगरसेवकपदी निवड झाल्याचे अधिकृतपणे घोषित केले आहे. त्यानुसार नगरसेवक म्हणून त्यांनी पालिकेत प्रवेश केला असला, तरी अजूनही अधिका-यांच्या टेबलावरील विद्युत विभाग, पाणीपुरवठा, स्थापत्य विभाग, आरोग्य विभागातील याद्यांवर जुन्या शिलेदारांचे नावे कायम आहेत. ई क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच माजी नगरसेवकांच्या प्रभाग व नावांचा फलक अजूनही तसाच आहे. किमान जुना फलक काढण्याची तसदीसुद्धा प्रशासनाने घेतली नाही. प्रशासकीय कामाकरिता दररोज येणाऱ्या हजारो नागरिकांच्या कटाक्षातून हा फलक सुटला नाही. फलकवरील माजी नगरसेवकांची नावे बघून नागरिकांना प्रशासनाच्या कारभाराची उदासीनता या निमित्ताने चव्हाट्यावर आली आहे. नवीन प्रभागरचनेनुसार प्रभागाची नावे व प्रभाग क्रमांक बदलले आहेत, तर माजी नगरसेवकांच्या यादीतील बरेच नगरसेवक पराभूत झाल्याने तेथे नवीन चेह-यांना संधी मिळाली असली, तरी त्यांचे या फलकावर नाव लिहायला व माजी नगरसेवकांची नावे वगळण्याची प्रशासन अधिकारी संधी शोधत असावे, असे चित्र आहे. (वार्ताहर)
फलकावर अजूनही जुनेच नगरसेवक
By admin | Published: March 22, 2017 3:14 AM