पिंपरी : पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत बुधवारी ओमायक्रॉनचे (omicron new cases found in pimpri chinchwad) सहा रुग्ण आढळले आहेत. त्यात तीन पुरूष आणि तीन महिलांचा समावेश आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. जपान, सिंगापूर, केनीयाहून आलेल्या प्रवाशांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रॉनवर उपचार करण्यासाठी भोसरी आणि पिंपरीत दोन रुग्णालय सज्ज ठेवली आहेत. आजपर्यंत परदेशातून आलेल्या ४५ तर त्यांच्या संपर्कातील २८ जणांना कोरोनाची बाधा झाली आहेत. या रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या घशातील द्रवाच्या नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय प्रयोगशाळेकडे पाठविले होते. त्यापैकी परदेशातून आलेल्या २० जणांचा ओमायक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर त्यांच्या संपर्कातील ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच रँडम तपासणीत नऊ जणांचा अहवाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे. त्यात उपचार घेऊन २५ जण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णापैकी एक जण जपानमधून, एक जण सिंगापूर, एक जण केनियातून, १ युऐसवरून, २ UAE वरून आलेला आहे. सर्वांवर भोसरीतील महापालिका आणि पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महापालिकेचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, ‘‘परदेशातून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. त्यापैकी १०९ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत, ओमायक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.