पिंपरी : मोहननगर प्रभाग क्रमांक २६चे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश टेकावडे यांच्यावर ते राहत असलेल्या ठिकाणी दोन वर्षांपूर्वी असाच हल्ला झाला होता. त्या वेळी पोटाला थोडी जखम झाल्याने या हल्ल्यातून ते बचावले होते. या वेळी मात्र हल्लेखोरांनी पूर्वनियोजनानुसार केलेल्या हल्ल्यात टेकावडे दगावले. राजकारणात गुन्हेगारीचा शिरकाव झाला असून, वीस वर्षात तत्कालिन नगरसेवक संजय काळे, अनिल हेगडे, अंकुश लांडगे या पाठोपाठ विद्यमान नगरसेवक अविनाश टेकवडे यांचा हल्यात बळी गेला आहे. दिवसाढवळ्या, तेसुद्धा नगरसेवकाच्या घरापर्यंत जाऊन हल्ला करण्यापर्यंतची मजल मारली गेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. २०१३मध्ये टेकावडे यांच्यावर हल्ला झाला होता. त्या वेळचे हल्लेखोर कोण, हे अद्याप स्पष्ट झाले नव्हते. २०१३मध्ये हल्ला झाला, त्या वेळी याच इमारतीत खाली तळमजल्यावर आरोपी पिलरच्या मागे लपून बसले होते. त्या वेळीही टेकावडे यांच्यावर हल्ला झाला. मात्र, थोडी सावधगिरी दाखविल्याने ते या हल्ल्यातून बचावले होते. गुरुवारी झालेला त्यांच्यावरील हल्ला मात्र पूर्वनियोजित व अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीचा होता. त्यात ते वाचू शकले नाहीत. या वेळी दोन जण अगोदरच त्यांच्या सदनिकेच्या जवळ जिन्यात दबा धरून बसले होते, तर एक जण तळमजल्यावर लक्ष ठेवण्यासाठी थांबून होता. गणेश अंगण या इमारतीच्या डाव्या बाजूला एक लोखंडी दरवाजा, तसेच समोर मुख्य प्रवेशद्वार, असा आत येण्याचा मार्ग होता. मुख्य दरवाजाने दुचाकीवरून हल्लेखोर आत आले. आरडाओरडा झाल्यास टेकावडे यांच्या मदतीला धावून येणारे मुख्य प्रवेशद्वारातून आत येतील, हा अंदाज बांधून हल्ल्यानंतर मुख्य दरवाजातून बाहेर न पडता, डाव्या बाजूच्या पाच फूट उंच भिंतीवर चढून उड्या मारून इमारतीच्या मागील बाजूने झोपडपट्टीकडे पळून गेले. हल्ल्यात टेकावडे वाचतील, अशी कोणतीच कसूर हल्लेखोरांनी ठेवली नाही. हल्लेखोर पूर्वीच्या हल्ल्यातील की दुसरे कोण, हे मात्र कळू शकले नाही. दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. टेकावडे यांचे मोहननगर प्रभागात कार्यकर्त्यांचे जाळे आहे. त्यांचे घर दाट लोकवस्तीच्या भागात आहे. असे असूनही भरदिवसा त्या ठिकाणी जाऊन हल्लेखोरांनी डाव साधला. (प्रतिनिधी)
एकदा बचावले, दुसऱ्या हल्ल्यात गाठले
By admin | Published: September 04, 2015 2:14 AM