पिंपरी : इंस्टाग्रामवरील जाहिरात पाहून गुंतवणूक केली असता २० लाख २४ हजार रुपयांची फसवणूक झाली. किवळे येथे १२ एप्रिल २०२४ रोजी ऑनलाइन पद्धतीने फसवणुकीचा हा प्रकार घडला.
किवळे येथील ४२ वर्षीय व्यक्तीने याप्रकरणी मंगळवारी (दि. ६) देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. जॅसलीन कौर बाथ, जयंत पिरामल या संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने इंस्टाग्रामवर अपोलो बिजनसे स्कूलची जाहिरात पाहून त्यावर क्लिक केले. त्यानंतर जॅसलीन कौर बाथ या संशयित व्यक्तीने व्हाटसअपव्दारे फिर्यादीशी संपर्क साधला. अपोलो अरिब नावाचे ॲपव्दारे शेअर मार्केटमध्ये विविध कंपन्यांचे शेअर्स विकत घेऊन त्याव्दारे अधिक नफा मिळवण्याचे आमिष दाखवले. वेळोवेळी विविध कंपन्यांचे शेअर्स विकत घेण्याच्या बहाण्याने फिर्यादीकडून १७ लाख ४० हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर घेऊन ते स्वत:च्या फायद्यासाठी वापरले.
दरम्यान इंस्ट्राग्रामवर जयंत पिरामल या संशयित व्यक्तीची जिओजित फायनान्शिअल सिक्युरिटी लिमिटेड या कंपनीची जाहिरात पाहून फिर्यादीने त्यावर विश्वास ठेवला. या कंपनी टेडिंगसाठी दोन लाख ८४ हजार रुपये गुंतवूणक केली. मात्र, संशयिताने या पैशांतून कोणत्याही कंपनीचे शेअर्स फिर्यादीच्या नावे विकत घेतले नाहीत. संशयितांनी फिर्यादीची २० लाख २४ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय वाघमारे तपास करीत आहेत.