पिंपरी : कुत्र्याच्या गळ्यात दोरी बांधून छळ केला. तसेच मारहाण करून कुत्र्याचा छळ केला. त्यावेळी एका तरुणाने कुत्र्याला सोडवून त्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. कासारवाडी येथे मंगळवारी (दि. ३०) हा प्रकार घडला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करून जामीनावर मुक्तता करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलसिंग रामचंद्र घायगुळे (वय ५०, रा. कासारवाडी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कृष्णा गंगाराम जमादार (वय २०, रा. कासारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. जखमी कुत्र्यावर पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत.फिर्यादी जमादार मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घरी जात होते. त्यावेळी त्यांच्या घराच्या परिसरात वावरणाऱ्या एका कुत्र्याच्या गळ्यात दोरी बांधून आरोपी घायगुळे त्याला ओढत होता. तसेच बांबूने मारत होता. त्यामुळे कुत्रा जखमी झाला. फिर्यादी जमादार यांनी त्या कुत्र्याला आरोपीच्या ताब्यातून सोडविले. संतोष मलिनमनी, आकाश जाधव, रोहित डिसुझा यांच्या मदतीने जखमी कुत्र्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, प्राण्यांचा छळ होत असल्याचे या घटनेवरून दिसून येत असल्याचे सांगत प्राणीमित्रांनी आरोपीला अटक करण्याची मागणी केली. त्यासाठी काही प्राणीमित्र बुधवारी (दि. ३१) दुपारपासून भोसरी पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. पोलिसांनी आरोपी बलसिंग घायगुळे याला बुधवारी अटक केली. त्यानंतर जामिनावर त्याची सुटका करण्यात आली.