पिंपरी : शेअर मार्केटमध्ये ३५० टक्के परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची २५ लाख ८३ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला. फसवणुकीचा हा प्रकार १३ नोव्हेंबर २०२३ ते १ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून घडला.
अमित प्रकाश बर्गे (४०, रा. शरदनगर, चिखली) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. ९) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमित शहा आणि एका संशयित महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी फिर्यादी बर्गे यांचा विश्वास संपादन करून त्यांना शेअर मार्केटमध्ये ३५० टक्के परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. बर्गे यांना त्यांच्या रोआर्क कॅपिटल इंडिया इक्विटी ७० व्हाटसअप ग्रुपला जाॅइन करून घेऊन त्या माध्यमातून प्रलोभने दाखवली. वेळोवेळी वेगवेगळ्या बँकांचे खाते क्रमांक देऊन त्यावर शेअर व आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे बर्गे यांनी त्यांच्रुा रोआर्क कॅपिटल इंडिया ॲपच्या माध्यमातून एकूण १५ लाख ८३ हजार रुपये बँक खात्यावरून पाठवले. त्या पाठवलेल्या रकमेचे एक कोटी रुपये झाले आहेत. ते काढण्यासाठी तुम्हाला १० लाख रुपये भरावे लागतील, असे सांगितले. तेव्हा नफ्याचे पैसे काढून घेण्यासाठी त्यांनी १० लाख रुपये भरले. मात्र, त्यांनी गुंतवलेली रक्कम तसेच नफ्याची रक्कम परत न करता संशयितांनी त्यांनी २५ लाख ८३ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर तपास करीत आहेत.