वडगाव मावळ : तळेगाव दाभाडे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाची डागडुजी व सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपये आणि देहूरोड येथील धम्मभूमी परिसराचे सुशोभीकरण व नूतनीकरण करणासाठी ५० लाख रुपयांचा निधी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून मंजूर झाला असल्याची माहिती आमदार बाळा भेगडे यांनी दिली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे व स्थळांना विकास करण्यासाठी हा निधी वितरित करण्यात आला आहे. डॉ. आंबेडकरांनी १९४८ च्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ सुरू करण्यासाठी ८५ एकर जागा व तळेगावात बंगला विकत घेतला होता. तेथे राज्यघटनेचे काही अंशी लिखाण झाले आहे. डॉ. आंबेडकर यांनी धर्मांतरापूर्वी देहूरोड येथे विहारामध्ये स्वहस्ते बुद्ध मूर्तीची स्थापना केली होती. नागपूरची दीक्षाभूमी, दादरची चैत्यभूमी याप्रमाणे या पवित्र ठिकाणास धम्मभूमी म्हणून संबोधतात. या ठिकाणांचे महत्त्व लक्षात घेऊन आमदार भेगडे यांनी निधीसाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. (वार्ताहर)
बाबासाहेबांचे निवासस्थान सुशोभीकरणास एक कोटी
By admin | Published: March 27, 2017 2:41 AM