पिंपरी : स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊन रुग्णांची संख्या २४१ झाली. एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३३ झाली आहे.जुलै महिन्यापासून अचानक स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली, तर मृतांची संख्याही वाढत आहे. या जीवघेण्या आजाराने रविवारी (दि. १४) ५३ वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. मृत्यू पावलेला रुग्ण पिंपरी येथील रहिवासी होता. त्याच्यावर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते.
शहरातील विविध रुग्णालयांमध्ये ११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. स्वाइन फ्लूचा धोका कमी होताना दिसत नाही. दिवसागणिक एक, दोन रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण होत असल्यामुळे रुग्णांची संख्या २४१ झाली आहे. संसर्गजन्य आजार असल्यामुळे त्याच्या संख्येमध्ये वाढच होताना दिसत आहे. पोषक वातावरणामुळे हा आजार बळावत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभागासह नागरिकांची चिंता वाढत आहे. तसेच स्वाइन फ्लूच्या विषाणूंपासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक लस व टॅमी फ्लूच्या गोळ्या घ्याव्यात.