पिंपरी, दि. 31 - पिंपळे गुरव येथे सातव्या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात असताना, त्या ठिकाणी शिवाजी चंदर शिंदे (वय २२, रा. वैदुवस्ती, पिंपळे गुरव) हा तरुण पाण्यात पडला. पवना नदीपात्रात बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. पिंपळे गुरव सृष्टी चौकाजवळील बुद्ध विहारानजिकच्या विसर्जन घाटावर तरुण गणेशमूर्ती बुडविण्यासाठी गेला होता. त्याला पोहोता येत नव्हते. तरुण बुडाल्याची दुर्घटना घडताच नागरिकांची मोठी गर्दी झाली. महापालिकेच्या अग्निशामक विभागाला याबाबत कळविण्यात आले. अग्निशामक दलाचे जवान तेथे तातडीने दाखल झाले. त्यांनी छोट्या होडीच्या साह्याने नदीपात्रात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. उशिरापर्यंत तरुणाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. दोन दिवसांपासून संततधार पाऊस झाला असल्याने नदीपात्र दुधडी भरून वाहत आहे. नदीपात्र भरून वाहत असताना, तरुण गाळात अडकला, की वाहून गेला याबद्दल तर्क वितर्क लावले जात आहेत.
गतवर्षी मामा, यंदा भाच्याचा मृत्यू गतवर्षी पिंपळे सौदागर येथील देवी आईमाता घाटावर अनंत चतुर्दशीच्या दिवशी अशीच दुर्घटना घडली होती. त्यात शंकर लोखंडे (वय ४५) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोहोण्यात तरबेज असतानाही त्यांचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी घडलेल्या दुर्घटनेतील तरुण शिवाजी शिंदे हा गतवर्षी मृत्यू झालेल्या लोखंडे यांचा भाचा आहे. नात्याने मामा- भाचे असलेल्या या दोघांचा एक वर्षात अशा पद्धतीने मृत्यू झाला. याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गणेश विसर्जनावेळी त्यामुळे विसर्जन घाटावरील सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा मुद्दा उपस्थित झाला आहे. महापालिकेने विसर्जन घाटावर सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.