पिंपरी : बांधकाम मजुरांमध्ये पत्ते खेळताना झालेल्या वादातून एकाने तिघांवर चाकूने हल्ला केला. त्यात एकाचा मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले. लक्ष्मीपुरा, देहूरोड येथे मंगळवारी (दि. १३) रात्री सव्वाबाराच्या सुमारास ही घटना घडली.
सखाराम विश्वनाथ मरकाम (वय २५, रा. विजयपूर, जि. बिलासपूर, छत्तीसगढ) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. जोधिया विश्वनाथ मरकाम (वय २३, रा. विजयपूर, जि. बिलासपूर, छत्तीसगढ), संजय हरबंसलाल वर्मा (वय २८, रा. परतवाणी, जि. बलोदा बाजार, छत्तीसगढ) अशी जखमींची नावे आहेत. शिवप्रसाद धूर्वे (वय २८, रा. छत्तीसगढ) असे हल्ला करणाऱ्या कामगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार कामगारांमध्ये पत्ते खेळण्यावरून वाद झाला. त्यांनी एकमेकांना मारहाण केली. शिवप्रसाद याने सखाराम, त्याचा लहान भाऊ जोधिया आणि संजय या तिघांवर चाकूने हल्ला केला. यामध्ये सखाराम याच्या छातीवर चाकूचा वार झाल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याचा मृत्यू झाला. जोधिया आणि संजय हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.