नारायण बडगुजर-पिंपरी : लॉकडाऊनदरम्यान संचारबंदी, जमावबंदीसह विविध निबंध लागू करण्यात आले. मात्र, काही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करून नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे समोर आले आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील लोकसंख्येपैकी अशा एक टक्का नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये या नागरिकांवर खटले दाखल झाले. बेशिस्त नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई होत आहे. तर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.
देशात पहिल्या टप्प्यात पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण आढळले होते. मार्गाच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरात रुग्ण आढळून आले. त्यामुळे १९ मार्चपासून शहरात जमावबंदीसह काही निबंध लागू करण्यात आले. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. विनाकारण घराबाहेर पडणे, मास्कचा वापर न करणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, तसेच एकत्र येऊन गर्दी करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अशा विविध निर्बंध व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नागरिकांवर कारवाई झाली.लॉकडाऊन दरम्यान संचारबंदी असताना विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची वाहने जप्त करण्यात येत होती. अशी २७३८ वाहने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जप्त केली. तसेच अशा वाहनचालकांवर खटलेदेखील दाखल करण्यात आले. त्याचप्रमाणे लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळून इतर दुकाने खुली ठेवण्यास मनाई होती. तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकानांना विशिष्ट वेळ निश्चित करून देण्यात आली होती. त्याकडे दुर्लक्ष करून दुकान उशिरापर्यंत सुरू ठेवणे, दुकानात ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना न करणे, फिजिकल डिस्टन्सिंगच्या पालनाकडे दुर्लक्ष करणे आदी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी काही दुकानदारांवर पोलिसांनी कारवाई केली. अशा दुकानदारांना तसेच इतर गुन्ह्यांमध्ये देखील दंडात्मक कारवाई करून एक लाख तीन हजार ८०० रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला.
...............
आयुक्तालयाच्या हद्दीत ४० लाखांवर लोकसंख्यापिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एक महापालिका, तीन नगरपालिका, एक कॅन्टोन्मेंट बोर्ड आदी स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश आहे. एमआयडीसी व आयटीपार्कदेखील असल्याने स्थलांतरितांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आयुक्तालयाच्या हद्दीतील तरंगती (फ्लोटिंग) लोकसंख्या ४० लाखांवर आहे. यातील एक टक्का नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केले म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. त्यानुसार १९ मार्च ते १६ सप्टेंबर या सहा महिन्यांमध्ये ४२६२५ नागरिकांवर भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये पोलिसांनी खटले दाखल केले आहेत.
.......................
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन व पोलिसांकडून विविध उपाययोजना
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन व पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. ९९ टक्के लोकांनी पोलीस व प्रशासनाला सहकार्य केले. लॉकडाऊन शिथिल झाला असला तरी जमावबंदीसह काही निर्बंध कायम आहेत. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे नागरिकांनी पालन करावे.- आर. आर. पाटील, सहायक पोलीस आयुक्त (जनसंपर्क)