हिंजवडी : बेंगळुरू - मुंबई महामार्गावर वाकड येथील सेवा रस्त्यावरील पूल खचला आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून दोन दिवसांसाठी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाला तडे गेले असून बालेवाडीच्या दिशेला पूल खचला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकी पूर्वी घाईघाईने उद्घाटन करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र केवळ चार महिन्यांतच पुलाला तडे जाऊन तो एकाबाजूने खचला आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये नोकरी- व्यवसायानिमित्त शहर आणि उपनगरांतून दररोज लाखो आयटीयन्स आणि नागरिक या मार्गाने ये - जा करतात. त्यामुळे येथे सातत्याने वाहतूक कोंडी होते. त्यावर उपाययोजना म्हणून सेवा रस्त्यासाठी हा पूल उभारण्यात आला. त्यामुळे वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र मुसळधार पावसामुळे पुलावर तडे गेल्याने तसेच तो बाजूने खचल्याने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाकडून दोन दिवसांसाठी वाहतूक बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तज्ज्ञांकडून परिक्षण केल्यानंतर सकारात्मक अहवाल मिळाल्यास पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे हिंजवडी वाहतूक शाखेचे अधिकारी उमेश लोंढे यांनी सांगितले.