पिंपरी: टपरीवरून सिगारेट आणण्यास नकार दिल्याने एकास मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी रात्री इंदिरानगर झोपडपट्टी, चिंचवड येथे ही घटना घ़डली आहे. सतीश उर्फ रोहित देविदास शिंगाडे (वय २२, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, चिंचवड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांनी याबाबत बुधवारी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी उमेश संभाजी पवार, अमोल संभाजी पवार, गोपल्या दांडे, बाळ्या उर्फ कृष्णा शिवाजी वारभवन, व्यंकटेश म्हेत्रे (सर्व रा. इंदिरानगर, चिंचवड) आणि अन्य तीन ते चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास शिंगाडे हे आक्रमक खान मित्राच्या वाढदिवस साजरा करून घरी जात होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला आरोपी घोळका करून थांबले होते. त्यातील अमोल पवार त्यांना मारून शेजारच्या टपरी वरून सिगारेट आणण्यास सांगितले. तेव्हा नकार देत 'मी आता घरी चाललो आहे, तू दुसऱ्या कोणाला तरी सांग' असे पवार याला सांगितले.
या गोष्टीचा राग आल्याने त्याने शिंगाडे यांच्या गालावर चापट मारली. यावर त्यांनी जाब विचारला असता आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून त्यांना शिवीगाळ केली. नंतर कोयते, चाकू आणि दगडाने डोक्यात, पोटावर आणि अंगावर ठिकठिकाणी मारून खूनी हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले.