पिंपरी : पोलीस असल्याचे सांगून एका अनोळखी व्यक्तीने एकाचे घरातून अपहरण केल्याची घटना घडली आहे. हिंजवडी परिसरात बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. याबाबत ३६ वर्षीय महिलेने अनोळखी व्यक्तीविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती फिर्यादी यांच्या घरी आला. त्याने आपण पोलीस असल्याचे फिर्यादींना सांगितले. त्यांच्या ४० वर्षीय पतीला त्याच्यासोबत पळवून नेले. फिर्यादींनी आरोपीला अडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने फिर्यादींच्या घराच्या दरवाजाची कडी बाहेरून लावली. फिर्यादी व पोलिसांनी याप्रकरणाची खात्री करून अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.