पिंपरी : ऑनलाईन कर्जाचे पैसे भरण्यास सांगून एनओसी मिळविण्यासाठी महिलेकडून तीन लाख ९४ हजार रुपये उकळले. त्यानंतर महिलेने पैसे देणे बंद केल्याने अश्लील मेसेज तिच्या नातेवाईकांना पाठवण्याची धमकी दिली. पिंपळे गुरव येथे ६ फेब्रुवारी २०२१ ते ३० एप्रिल २०२२ या कालावधीत ही घटना घडली.
अमित, मॅनेजर राहुल शर्मा, समीर, तसेच इतर चार मोबाईल क्रमांकधारकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने शनिवारी (दि. ३०) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने ऑनलाईन माध्यमातून कर्ज घेतले होते. त्या कर्जाचे पैसे भरण्यास सांगून एनओसी मिळविण्यासाठी व वेगवेळी कारणे सांगून आरोपींनी फिर्यादीकडून तीन लाख ९४ हजार २३२ रुपये ऑनलाईन माध्यमातून स्वीकारले. हे कर्जाचे प्रकरण न मिटवता आरोपींनी फिर्यादीची फसवणूक केली.
फिर्यादीने पैसे देण्याचे बंद केल्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या मोबाईल क्रमांकावर फोन व मेसेज करून त्यांना शिवीगाळ केली. फिर्यादीच्या कागदपत्रांच्या आधारे मिळालेल्या खासगी माहितीवरून त्यांच्या नातवाईकांना फिर्यादीबाबत अश्लील मेसेज पाठवण्याची धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.