पिंपरी : ई-मेल आयडीमध्ये एका अक्षराचा बदल करून एका कंपनीला ई-मेल केला. तसेच बँक बदलली असून नवीन बँकेच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सांगून फसवणूक केली. मात्र, ही बाब लक्षात येताच याबाबत तक्रार करण्यात आली. त्यानंतर पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या सायबर सेलने विदेशातील बँकेशी संपर्क साधून ६५ लाख रुपये संबंधित कंपनीला परत मिळवून दिले. सायबर सेलचे पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथील पिनॅकल इक्विपमेंट प्रा. लि. या कंपनीचे जर्मनी येथील कंपनीसोबत नियमित व्यवहार होत होते. जर्मनीतील कंपनीच्या मुंबई येथील प्रतिनिधीमार्फत सदरचे व्यवहार होत होते. त्यामुळे पिनॅकल इक्विपमेंट कंपनीच्या कार्यालयीन ई-मेल आयडीवरून मुंबई येथील प्रतिनिधीच्या कार्यालयीन मेल आयडीवर मालाच्या व पेमेंटच्या संदर्भात नियमित ई-मेल होत होते. दि. १६ मार्च २०२० रोजी पिनॅकल इक्विपमेंट कंपनीच्या कार्यालयीन ई-मेल आयडीवर जर्मनीतील कंपनीच्या मुंबई येथील प्रतिनिधीच्या मेल आयडीसारखाच दिसणाºया; परंतु थोडासा बदल केलेल्या फेक मेल आयडीवरून सदरची कंपनी त्यांची बँक बदलत असल्याचा ई-मेल आला. मुंबई येथील प्रतिनिधीच्या कार्यालयीन ई-मेल आयडीवर नियमित ई-मेल होत असल्याने पिनॅकल कंपनीच्या प्रतिनिधीने आलेल्या ई-मेलचा आयडी व्यवस्थित न बघता, नवीन बँकेच्या डिटेल्स पाठविण्याबाबत संबंधितास कळविले. त्यानंतर फेक ई-मेल आयडीवरून जर्मनीतील बँकेमध्ये पेमेंट करण्यास सांगितले. त्यानुसार दि. २० मार्च २०२० रोजी पिनॅकल कंपनीच्या बँक खात्यावरून जर्मनीतील बँकेच्या खात्यावर ६५ लाख ६७ हजार ७८० रुपये इतकी रक्कम पाठविली. परंतु जर्मन कंपनीच्या मुंबई येथील प्रतिनिधीने त्यांना रक्कम मिळाली नसल्याचे सांगितले. त्यामुळे पिनॅकल कंपनीच्या प्रतिनिधीने ई-मेल तपासला असता, संबंधित ई-मेलच्या आयडीमधील एका अक्षरामध्ये बदल केला असल्याचे दिसून आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली. ई-मेल आयडी हॅक न होता, अज्ञात आरोपीने मुंबई येथील प्रतिनिधीच्या ई-मेल आयडीसारखाच दिसणारा बनावट ई-मेल आयडी तयार केल्याचे सायबर सेलच्या लक्षात आले. त्यामुळे तत्काळ जर्मनीतील बँकेशी संपर्क साधून हा व्यवहार थांबविण्याबाबत कळविले. त्यानंतर ६४ लाख ७७ हजार २९० रुपये पिनॅकल कंपनीच्या बँक खात्यावर परत करण्यात आली.सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहायक पोलीस निरीक्षक संभाजी जाधव, पोलीस उपनिरीक्षक उत्कर्षा देशमुख, पोलीस कर्मचारी अतुल लोखंडे, भास्कर भारती, मनोज राठोड, नीतेश बिचेवार, विशाल गायकवाड, पोपट हुलगे, प्रदीप गायकवाड, वैशाली बर्गे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
अडीच लाख रुपये मिळविले परत लॉकडाऊन काळात नागरिकांची आॅनलाइन फसवणूक होत असल्याचे समोर येत आहे. अशा नागरिकांना त्यांचे दोन लाख ५१ हजार ५४ रुपये परत मिळवून देण्यात पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या सायबर सेलला यश आले आहे. अशा पद्धतीने एकूण ६७ लाख २८ हजार ३४४ रुपये रिफंड झाले आहेत.