पिंपरी : आयटी पार्क परिसरात हिंजवडी एस्काॅर्टस या नावाने वेबसाईट तयार करून तसेच सोशल मीडियावरून ऑनलाईन वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. गिऱ्हाईकांनी संपर्क साधल्यानंतर त्यांना व्हाटसअॅपवरून मुलींचे फोटो पाठविण्यात येत असत. याप्रकरणी हिंजवडीपोलिसांनी मंगळवारी धडक कारवाई करून महाराष्ट्र, आसाम व बिहार येथील चार मुलींची सुटका करून त्यांना बालसुधारगृहात पाठविले. तसेच तीन आरोपींना अटक केली.
जीवन संतोष ताथवडे (वय २३, रा. चिंचवड, मूळगाव पिंपळवडी, ता. खेड), रामदास सोपानराव साळुंखे (वय ६२, रा. येरवडा), अनिकेत चंद्रकांत भालेराव (वय २६, रा. रावेत), असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून, त्यांच्यासह इतर तीन आरोपींविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
आरोपी यांनी एक वेबसाईट तयार करून हिंजवडी एस्काॅर्टस नावाने वेश्याव्यवसायासाठी मुली पुरविण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी सोशल मीडियावर मोबाईल क्रमांक प्रसारित केला. त्या क्रमांकावर ग्राहक संपर्क साधत असत. त्यानंतर ग्राहकाच्या व्हाटसअॅपवर मुलींचे फोटो पाठवून ग्राहकाच्या पसंतीनुसार पाहिजे त्या ठिकाणी मुली पुरविण्यात येत असत. त्यासाठी आरोपी ग्राहकांकडून आठ ते २० हजार रुपये घेत होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. बनावट ग्राहकाने आरोपी यांच्याशी मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर व्हाटसअॅपचा कुशलतेने वापर करून पोलिसांनी कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींकडून एक रिक्षा, मोबाईल फोन असा एकूण ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ऑनलाईन वेश्याव्यवसायासाठी ऑनलाईन पद्धतीने आरोपींनी भुमकर वस्ती येथील अदिती एक्झिक्युटिव्ह, ओयो हाॅटेल या हाॅटेलचा वापर केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत, निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, उपनिरीक्षक पंडीत अहिरे, पोलीस कर्मचारी किरण पवार, नितीन पराळे, दीपक शिंदे, विजय घाडगे, रवी पवार, तेजश्री म्हैशाळे, पुनम आल्हाट, सुप्रिया सानप यांच्या पथकाने ही कामगिरी केली.