पिंपरी : लाकडी सोफासेट ऑनलाईन विक्री करणे चार्टर्ड अकाउंटंटला महागात पडले आहे. सोफा खरेदी करण्याच्या बहाण्याने क्यूआर कोड पाठवून तो स्कॅन करायला लावून ३९ हजार ९८० रुपयांना ऑनलाईन गंडा घातला. हा प्रकार ८ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी अकरा ते साडेअकरा दरम्यान घडला.
सत्यरायण त्रिनाथडो (वय ३९, रा. प्राधिकरण निगडी) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कन्हैया कुमार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. फिर्यादी हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत. नोकरीनिमित्त ते मुंबई येथे शिफ्ट होणार असल्याने त्यांनी त्यांच्या प्राधिकरण येथील घरातील लाकडी सोफासेट विक्रीची ओएलएक्स या ऑनलाईन खरेदी-विक्री करण्याच्या वेबसाईटवर जाहिरात दिली. त्यानंतर आरोपीने त्यांना फोन करून सोफा खरेदी करायचा असल्याचे सांगितले. पाच हजार रुपयांना सोफा विकायचा आहे, असे फिर्यादी यांनी सांगितले. सोफा खरेदीस तयार असल्याचे सांगून आरोपीने फिर्यादी यांच्या मोबाइलवर क्यूआर कोड पाठवला. तो क्यूआर कोड फिर्यादी यांनी चार वेळा स्कॅन केला. त्याद्वारे आरोपीने फिर्यादी यांच्या बँक खात्यातून ३९ हजार ९८० रुपये ऑनलाईन काढून घेऊन फसवणूक केली.