पिंपरी : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लाल बहादूर शास्त्री भाजीमंडईत कचरा साचला आहे. त्यामुळे येथे ‘रोगट’ वातावरण आहे. त्यासाठी येथील कचरा उचलण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार गुरुवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कचरा उचलण्यात आला. मात्र संबंधित कर्मचाऱ्यांनी येथील कचरा पूर्णपणे उचलला नाही. केवळ दिखाव्यासाठी कचरा उचलण्यात आल्याचे दिसून येत असून, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून चालढकल केली जात आहे. परिणामी अद्यापही मंडईत कचरा साचला आहे. त्याच्या दुर्गंधीने भाजीपाला विक्रेते, अन्य व्यावसायिक आणि ग्राहक त्रस्त झाले आहेत.संबंधित ठेकेदाराने गुरुवारी कचरा उचलण्यासाठी यंत्रणा कामास लावली. मात्र तरीही येथील कचरा पूर्णपणे उचलण्यात आला नाही. संबंधित कर्मचाऱ्यांनी केवळ काही कचरा उचलला. त्यामुळे उर्वरित कचरा अजूनही मंडईत पडला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील कचरा संकलनाचे काम नवीन ठेकेदाराकडे देण्यात आले आहे. मात्र असे असले तरी शहरातील कचरा समस्या कायम आहे.शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर कचरा दिसून येतो. तसेच कचराकुंड्या ओसंडल्या आहेत. याबाबत महापालिका अधिकाऱ्यांकडे तक्रारींचा पाऊस पडत आहे. मात्र त्यांच्याकडून अद्याप ठोस कार्यवाही होत असल्याचे दिसून येत नाही. अशीच परिस्थिती पिंपरीतील भाजीमंडईत आहे. येथील कचराकुंडी ओसंडत आहे. कचरा सर्वत्र पसरला आहे. हा कचरा उचलण्याबाबत कर्मचारी उदासीन आहे. त्यामुळे येथील व्यावसायिक, विक्रेते, ग्राहक आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे...........पिंपरीतील भाजीमंडईत आणि परिसरात सातत्याने वर्दळ असते. त्यामुळे येथे स्वच्छता आवश्यक आहे. मात्र पाऊस झाल्याने आरोग्य विभागाने येथील कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी तीन दिवसांत कचरा कुजून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी झाली. याचा येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कचरा त्वरित उचलण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कचरा उचलण्याची सूचना करण्यात आली. ........पिंपरीतील भाजीमंडईत दोन दिवसांत ७० टक्के कचरा उचलला आहे. पहिल्या दिवशी बुधवारी जेसीबीच्या साह्याने कचरा उचलला. त्यानंतर गुरुवारी कर्मचाऱ्यांनी दोन ट्रक कचरा उचलला. उर्वरित कचरा रात्री उचलण्यात येईल.- महादेव शिंदे, सहायक आरोग्य अधिकारी, ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय, महापालिका
महापालिकेकडून चालढकल करत दोन दिवसांत उचलला केवळ निम्माच कचरा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 2:33 PM
शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लाल बहादूर शास्त्री भाजीमंडईत कचरा साचला आहे. त्यामुळे येथे ‘रोगट’ वातावरण आहे.
ठळक मुद्दे केवळ दिखाव्यासाठी कचरा उचलण्यात आल्याचे निदर्शनास दुर्गंधीने भाजीपाला विक्रेते, अन्य व्यावसायिक आणि ग्राहक त्रस्त महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कचरा उचलण्याची सूचना