पिंपरी : महापालिकेच्या धन्वंतरी स्वास्थ्य योजनेंतर्गत अनेक कर्मचारी किरकोळ आजारांसाठी, आवश्यक नसतानाही धन्वंतरी पॅनलवरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत असल्याचे उघड झाले आहे. याची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. यापुढे तातडीच्या उपचारांव्यतिरिक्त इतर सर्व आजारांसाठी महापालिकेच्या आठ रुग्णालयांमार्फत पत्र घेऊनच धन्वंतरी योजनेच्या पॅनलवरील रुग्णालयात कर्मचाऱ्यांना उपचार घेता येणार आहेत. महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी, तसेच कुटुंब व्याख्येनुसार, त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंबीय आणि निवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी धन्वंतरी स्वास्थ्य योजना १ सप्टेंबर २०१५ पासून सुरू केली. योजना सुरू झाल्यानंतर कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक धन्वंतरी योजनेच्या पॅनलवरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. धन्वंतरी योजनेमध्ये उपचार घेतलेल्या अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक यांची संख्या एप्रिल २०१६ ते फेब्रुवारी २०१७ अखेर ५ हजार २०३ इतकी झाली, असून त्यासाठी २० कोटी एवढ्या रकमेची बिले मिळाली आहेत. या योजनेंतर्गत अनेक कर्मचारी किरकोळ आजारांसाठी, तसेच आवश्यक नसतानाही धन्वंतरी पॅनलवरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत असल्याचे उघड झाले आहे. त्याचबरोबर कारण नसताना काही रुग्णालये रुग्णांच्या अनावश्यक तपासण्या करताना दिसत आहेत. योजनेमध्ये सुसूत्रतेच्या दृष्टीने काही ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)६ मार्च २०१७ रोजी महापालिका आयुक्त, कर्मचारी महासंघ, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, धन्वंतरी स्वास्थ्य समिती सदस्य यांची बैठक होऊन धन्वंतरी योजनेच्या अंमलबजावणीबाबत चर्चा झाली. आयुक्त दिनेश वाघमारे यांनी तातडीच्या उपचाराव्यतिरिक्त इतर सर्व आजारांसाठी महापालिकेच्या आठ रुग्णालयांमार्फत पत्र घेऊन धन्वंतरी योजनेंतर्गत पॅनलवरील रुग्णालयात उपचार घेण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार हृदय व अस्थिरोग उपचारासंदर्भात वायसीएम रुग्णालयाकडून पत्र घेण्यात यावे. या व्यतिरिक्त महापालिकेच्या इतर रुग्णालयांत उपलब्ध असलेल्या विशेष तज्ज्ञांकडून किंवा इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आजारासंदर्भात पत्र घेण्यात यावे.
...तरच धन्वंतरी योजनेचा लाभ
By admin | Published: March 30, 2017 2:26 AM