खडकी : येथील नेहरू उद्यान (त्रिकोणी गार्डन) येथे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे सुसज्ज ग्रंथालय उभारण्याचा निर्णय बोर्डाच्या सभेत घेण्यात आला़ या प्रकल्पासाठी उद्यानातील झाडेही तोडण्यात येणार आहेत़ त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मात्र या प्रकल्पास खडकीतील नागरिकांकडून विरोध होत आहे. त्रिकोणी गार्डनमध्ये ग्रंथालय उभारू देणार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे. त्याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डाला निवेदन देण्यात आले आहे.
खडकी नागरिक कृती समितीतर्फे रक्षा मंत्रालय, पर्यावरण विभाग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार अनिल शिरोळे, आमदार विजय काळे, खडकी बोर्डाचे अध्यक्ष पी. एस. जैस्वाल यांना निवेदन देण्यात आले आहे. त्रिकोणी गार्डन खडकीतील एकमेव सर्वसुविधांयुक्त उद्यान आहे. येथे ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. तसेच ओपन एअर जिमसुद्धा याच उद्यानात आहे. त्यामुळे येथे महिला व तरुण व्यायामासाठी येतात. हे उद्यान ज्येष्ठ नागरिकांसाठी एकमेव सुरक्षित विरंगुळ्याचे ठिकाण आहे. बोर्डाने या उद्यानात सार्वजनिक ग्रंथालयाचा घाट घातला तर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होईल. उद्यानाचे सौंदर्यही नष्ट होईल. लाखो रुपयांचे व्यायामाचे साहित्य मोडीत निघेल. त्यामुळे खडकी नागरीक कृती समितीतर्फे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला विनंती केली आहे. कित्येक वर्षांपासून खडकी बाजारातील बोर्डाचे महात्मा गांधी वाचनालय धूळ खात पडले आहे. बोर्डाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. या वाचनालयात कोणी वाचन करण्याकरिता येत नाही. त्यामुळे प्रशस्त जागेतील हे वाचनालाय गेल्या कित्येक वर्षांपासून पडून आहे. याच वाचनालयाचे नूतनीकरण करून बोर्ड नवीन ग्रंथालयासाठी होणारा लाखोंचा खर्च वाचवू शकते, असे खडकीतील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत आठ झोपडपट्ट्या असून, सुमारे दोन ते अडीच लाख लोकसंख्या आहे. या परिसरात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एकही सुसज्ज ग्रंथालय नाही. त्यामुळे येणाऱ्या तरुण पिढीचा विचार करून नेहरू उद्यानामध्ये सुसज्ज अशी संगणकीकृत दोन मजली दोन हजार चौरस फूट जागेत ई-लायब्ररी उभारण्याचे बोर्डाने ठरविले आहे़ झोपडपट्टीसारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अडचण येते़ शहरापासून किंचित अंतरावर असलेल्या शांत ठिकाण म्हणून नेहरू उद्यानाची निवड करण्यात आली आहे़ आमदार निधीतून ग्रंथालयाच्या पुस्तकांसाठी चाळीस लाख रुपयांचा निधी बोर्डाला मिळाला आहे़ सर्वांचा विचार करण्यात येईल त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचाही विचार करण्यात येईल.- अमोल जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी,खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डसर्वांचे विचार विचार लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल़ खडकी व आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेऊन बोर्डाने सर्वानुमते निर्णय घेतला आहे़ विद्यार्थ्यांसाठी खडकी भागात एकही ग्रंथालय नाही़ बोर्डाचे महात्मा गांधी ग्रंथालयाची जागा अपुरी आहे़ बोर्डाने ई-लायब्ररी करण्याचा विचार केला आहे़ त्यामुळे साधारण दोन हजार चौरस फूट जागा अपेक्षित होती़ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नेहरू उद्यानाच्या अगदी जवळच हाकेच्या अंतरावर जॉगिंग गार्डनचे कामही बोर्डातर्फे सुरू आहे, त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही़ मात्र नवीन होणाºया ग्रंथल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल़- कमलेश चासकर, उपाध्यक्ष,खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भावी पिढीचा विचार करून वातानुकूलित ई-लायब्ररी भव्य जागेत बनवण्याचा विचार करीत आहे़ क्रीडा क्षेत्रात जसे खडकीचे नावलौकिक आहे़ तसेच नाव शैक्षणिक क्षेत्रातही व्हावे या उद्देशाने ग्रंथालयाचे काम करण्यात येणार आहे़ त्यामुळे सर्व खडकीकरांनी सहकार्य करावे.- दुर्योधन भापकर,नगरसेवक, वॉर्ड क्रमांक ७,खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डकुठल्याही परिस्थितीत नेहरू उद्यानात ग्रंथालय होऊ देणार नाही़ गरज पडल्यास आंदोलन, मोर्चे ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने काढण्यात येतील़ इतर ठिकाणी बोर्डाने हा प्रकल्प स्थालांतरित करावा़- अशोक राठोड,ज्येष्ठ नागरिक, खडकी