Pimpri Chinchwad: पक्षातीलच पदाधिकऱ्यांचा विरोध; अखेर पिंपरीतून अण्णा बनसोडे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 03:28 PM2024-10-23T15:28:57+5:302024-10-23T15:29:39+5:30
आमदार बनसोडे नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत. प्रभागातील काम करतात पण नगरसेवकांना विचारत नाहीत, असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला होता
पिंपरी: आमदार बनसोडे नगरसेवकांना विश्वासात घेत नव्हते. लोकांना भेटत नव्हते अशी पक्षातील पदाधिकाऱ्यांची नाराजी होती. मतदारसंघात नवीन उमेदवार देण्याची मागणीही केली जात होती. नवनियुक्त शहराध्यक्ष यांनी अप्रत्यक्षपणे बनसोडे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. मात्र आज जाहीर झालेल्या अजित पवार गटाच्या पहिल्याच यादीत अण्णा बनसोडे यांचे नाव दिसून आले आहे. त्यामुळे विरोध करणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. महायुतीकडूनअजित पवार गटाची पहिली यादी जाहीर झाली. त्यामध्ये पिंपरीतून अण्णा बनसोडे यांना विधानसभेच्या रणधुमाळीत उतरण्याची संधी देण्यात आली आहे. यावरून विरोध करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीला फेटाळल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे.
आमदार बनसोडे नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत. प्रभागातील काम करतात पण नगरसेवकांना विचारत नाहीत. नवीन चेहरा देण्याची लोकांची मागणी आहे. पिंपरीत राष्ट्रवादीचाच आमदार होईल. कोणीही नवीन आमदार आला तरी त्याच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. खासदार श्रीरंग बारणे यांचेही चांगल्या माणसाला उमेदवारी द्यावी असे मत आहे. चेहरा बदली करायचा असेल तर जितेंद्र ननावरे यांना उमेदवारी द्या. मी झोकुन देऊन काम करणार असल्याची ग्वाही खासदार बारणे यांनी दिल्याचे देखील शहराध्यक्ष बहल यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. मात्र त्यांचे मत विचारात न घेता बनसोडे यांना उमेदवारी देण्यात आली.
यांनी केली पिंपरीतून होती मागणी...
आमदार अण्णा बनसोडे, माजी नगरसेवक काळूराम पवार, जितेंद्र ननावरे, शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुख, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, आरपीआएच्या चंद्रकांता सोनकांबळे, भाजपच्या माजी नगरसेविका सीमा सावळे, भाजपचे राजेश पिल्ले, तेजस्विनी कदम आदींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पिंपरीतून उमेदवारींची मागणी केली होती.