पिंपरी : भारतीय जनता पार्टीने पिंपरी-चिंचवडकरांना निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा निषेध शहरातील विविध राजकीय पक्षांनी केला. भक्ती शक्ती चौकात गाजराची तोरणे उभारून सरकारचा निषेध केला. शिवसेना, नागरी हक्क कृती समिती, मनसे अशा विविध पक्षांनी निदर्शने केली.
पिंपरी-चिंचवडमधील प्रश्न न सटल्यामुळे भक्ती-शक्ती चौकात शिवसेना, मनसे आणि विविध सामाजिक संस्थांच्यावतीने निदर्शने करण्याचा इशारा दिला होता. मात्र, पोलिसांनी आंदोलनाच्या एक दिवस अगोदरच सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर आणि मनसेचे गटनेते सचिन चिखले यांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला असतानाही उर्वरित कार्यकर्त्यांनी निगडीतील भक्ती-शक्ती चौकात आंदोलन केले. गाजराचे तोरण बांधले होते. यामध्ये शिवसेना संघटिका सुलभा उबाळे, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, नागरी हक्क कृती समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सुलभा उबाळे म्हणाल्या, ‘‘विधानसभा निवडणूकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक आश्वासने दिली होती. गेल्या चार वर्षांत मुख्यमंत्र्यांनी शहरवासियांना अनेकदा जीआर दाखविण्यात आले. मात्र, एकही प्रश्न सुटलेला नाही. शंभर दिवसात बांधकामे नियमित करू, असे आश्वासन दिले. प्रत्यक्षात किती बांधकामे अधिकृत झाली. शंभर टक्के शास्ती कर माफी देऊ, असे आश्वासनही हवेत विरले. शहरवासियांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसप्रमाणेच भाजपाचाही कारभार आहे. केवळ आश्वासनेच पदरी पडली आहेत.’’