पिंपरी : ब्रँडेड वस्तू मागवून त्याच्या जागी बनावट वस्तू ठेऊन फ्लिपकार्ट (Flipkart) कंपनीला परत पाठविल्या. विश्वासघात करून कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी २५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसाांनी एकाला अटक केली. डांगे चौक, वाकड येथे २७ सप्टेंबर ते २२ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
पुनित चावळेकर (सौरभ जगदीश नामदेव), असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यासह राजू भाई, अनिल रावत, रोहित सोनवणे आणि अन्य २१ जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुलाब शंकर काटे (वय ३९, रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. २३) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ॲपल कंपनीचे एअरपोड वायरलेस, वायरसह, चार्जरसह तसेच वन प्लस ब्ल्यूटुथ हेड सेट या वस्तू ३ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर दरम्यान आरोपींनी डांगे चौक, थेरगाव येथे फ्लिपकार्ट डॉट कॉम या वेबसाईटवरून मागवल्या. आरोपींनी यूजर आयडी व मोबाईल क्रमांकाचा वापर करून एकूण नऊ लाख ३५ हजार ४४० रुपयांचे साहित्य मागवले. वस्तू मागवून आरोपींनी त्या परत केल्या. कंपनीने आरोपी ग्राहकांना त्यांनी मागवलेल्याच वस्तू दिल्या होत्या, मात्र आरोपींनी खोडसाळपणे मागवलेल्या वस्तूंच्या जागी बनावट वस्तू ठेवून त्या परत केल्या. फ्लिपकार्ट कंपनीचा विश्वासघात करून आरोपींनी फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.