पिंपरी : आरोग्य संचालक तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा चार्ज घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या शिस्तीबाबत एक परिपत्रक काढले आहे. यामध्ये आराेग्य खात्यातील विभाग प्रमुख, प्रादेशिक विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, इतर अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयीन शिस्तीचे पालन करण्याबाबत वेळोवळी सूचना दिलेल्या आहेत. तरीही बहुतांश जण शिस्तीचे पालन करत नसल्याची बाब निदर्शनास येत आहे. या शिस्तीचे पालन न करणे ही बाब गैरवर्तणूक या सदरात अंतर्भूत होत असल्याने सर्व विभाग प्रमुख, प्रादेशिक विभाग, प्रमुख कार्यालय प्रमुख व इतर अधिकारी यांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यासाठी तुकाराम मुंढे यांनी परिपत्रक काढत आदेश दिले आहेत.
त्यानुसार, शासकीय सुट्टीच्या दिवशीही परवानगी घेऊनच मुख्यालय सोडता येणार आहे. रात्रीच्या वेळी ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांची ड्यूटी आहे, त्यांना रुग्णालयात उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे. अपवादात्मक स्थितीतच कर्मचाऱ्यांना सुट्टी घेता येणार असल्याचे आदेशात नमूद केेले आहे.
सातत्याने विलंब कराल, तर विभागीय चौकशी
तीनपेक्षा जास्त वेळा विलंबाने येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्या बाबतीत नैमित्तिक अनुज्ञेय रजा मांडण्यात यावी. सातत्याने विलंबाने येण्याची सवय असल्यास त्या प्रकरणी विभागीय चौकशीची कार्यवाही करण्यात येणार आहे. यासाठी दरमहा विभाग प्रमुख, प्रादेशिक विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख व इतर अधिकारी यांनी आढावा घेणे आवश्यक आहे.
आरोग्य कर्मचारी काय म्हणतात?
आरोग्य विभागामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पदे रिक्त असल्याने त्याचा ताण वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत येत असल्याचे एका वैद्यकीय अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
आरोग्य संचालकांनी जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये यांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. रात्रीच्या वेळीदेखील रुग्णांना तातडीची सेवा मिळावी यासाठी ही तपासणी मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे.
- डॉ. संजोग कदम, आरोग्य उपसंचालक, पुणे परिमंडळ.
अधिकाऱ्यांच्या अचानक भेटी
आराेग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आराेग्य अधिकारी यांनी ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आराेग्य केंद्र यांना रात्रीच्या वेळी अचानक भेट द्यायची आहे. तेथे सर्व डाॅक्टर उपस्थित हाेते का, स्वच्छता, रुग्णवाहिका आहेत का हे पाहायचे आहे.