नारायण बडगुजरपिंपरी : परवानगी नाकारलेली असतानाही गौतमी पाटील हिचा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला. याप्रकरणी आयोजकांच्या विरोधात म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. ३०) गुन्हा दाखल केला.
समीर रामदास गवारे, आनंद चिंतामण गवारे, विश्वनाथ शांताराम गवारे (सर्व रा. मोई, ता. खेड) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस कर्मचारी शहानवाज मुलाणी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतमी पाटील यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमाचे मोई येथे मंगळवारी (दि. ३०) आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही आयोजकांनी कार्यक्रम घेतला. तसेच पोलिसांनी दिलेल्या नोटीसीचे देखील पालन करण्यात आले नाही. त्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
गौतमी पाटील हिच्या गाण्यांच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होते. यात गौतमीच्या नृत्यावर तरुणाई थिरकते. यातून काही ठिकाणी वादाचे प्रसंग घडले. त्यामुळे गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमासाठी पोलिसांची परवानगी घेण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. असे असतानाही पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत परवानगी नाकारल्यानंतरही गौतमी पाटील हिचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. पोलिसांकडून प्रकरणी गुन्हे दाखल केले जात आहेत.