पिंपरी : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला चीन, पाकिस्थानातून निधी येत आहे, असे विधान उपमहापौर केशव घोळवे यांनी केले होते. याचा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने निषेध केला. ‘‘माफी मागा नाहीतर महापालिकेत पाय ठेऊ देणार नाही.’’, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे.
राष्ट्रवादी युवकचे प्रमुख पदाधिकारी दुपारी उपमहापौर केशव घोळवे यांच्या दालनात दाखल झाले. घोळवे यांनी मंगळवारी सर्व साधारण सभेत शेतकऱ्यांचा अवमान करणारे वक्तव्य केले होते. त्याचा निषेध करण्यासाठी व घोळवे यांनी देशातील शेतकऱ्यांची माफी मागावी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. उपमहापौरांना फळे द्यायची होती, मात्र, उपमहापौर अॅन्टीचेंबरमधून बाहेर आले नाही. यावेळी भाजपाचे तुषार कामठे यांनी मध्यस्ती केली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खुर्चीला पालेभाज्या व फळांचा हार घालून उपमहापौरांचा निषेध केला. उपमहापौरांनी माफी मागावी, अन्यथा, महापालिकेत उपमहापौरांना पाय ठेऊन देणार नाही, असा इशारा दिला.
यावेळी विरोधी पक्षनेता राजू मिसाळ, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, नगरसेवक मयूर कलाटे, पंकज भालेकर, राष्ट्रवादी युवक शहर उपाध्यक्ष प्रसाद कोलते, निखिल दळवी, पिंपरी विधानसभा अध्यक्ष शेखर काटे तसेच सनी डहाळे, अक्षय माचरे, अशोक भडकुंबे, मनजितसिंह कोहली, सोनू बोदडे, श्री सोनिगिरा, प्रतिक साळुंखे आदी उपस्थित होते.