काळेवाडी : ग्रेड सेपरेटरमधील दुरुस्तीच्या कामामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. इन आणि आऊटचा कोणताही फलक नसल्यामुळे वाहनधारकांचा गोंधळ उडत असून, यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या इन-आऊटमध्ये बदल करण्याचे काम सुरु आहे. या ग्रेडसेपरेटरमध्ये सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे वाहने वेगाने जात असतात. इन-आऊटच्या ठिकाणी वाहनधारक बेशिस्तरित्या महामार्गामध्ये वाहने घुसवतात. आऊटमधून इनमध्ये प्रवेश करताना ग्रेडसेपरेटरधील वाहनांचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता आहे. तसेच बाहेर पडणाऱ्या वाहनधारकांनादेखील आऊट कुठे आहे, हे लवकर लक्षात येत नाही. तसेच ग्रेड सेपरेटरमध्ये अपघात होण्याच्या घटनादेखील मोठ्या प्रमाणात घडत असून, मागील महिन्यातच एका दुचाकीला पाठीमागून वाहनाने धडक दिल्याने युवकाचा मृत्यू झाला. बहुतांश वाहनधारक नियमांचे पालन न करता इनमध्ये तर काही वाहनधारक इनमधुन आऊटमध्ये वाहन काढत असल्यामुळे वाहने समोरा-समोर धडकण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनातर्फे इन-आऊटच्या ठिकाणी काम सुरु असताना सूचना फलक लावण्यात येत नाहीत. यामुळे वाहन थेट इन-आऊटच्या दुभाजकावर धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. (वार्ताहर)
इन-आऊटमुळे चालक आऊट
By admin | Published: October 15, 2016 2:53 AM