पिंपरी : कोरोना चाचणीच्या अहवालास उशीर झाल्याने मोशीतील क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांनी गोंधळ घातला. चांगले जेवण मिळत नसून इतर सुविधांचाही अभाव असल्याची तक्रार करीत त्यांनी केंद्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टीत प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांचा सोमवारी उद्रेक झाला. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी मोशीत क्वारंटाईन सेंटरमध्ये उद्रेकाचा प्रकार समोर आला. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर नागरिकांना निर्बंध नकोसे झाले असून, त्याच मानसिकतेतून उद्रेकाचा पॅटर्न रुजत असल्याचे दिसत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून मोशी येथे आदिवासी विद्यार्थी केंद्रात क्वारंटाइन सेंटर करण्यात आले आहे. पुरुष, महिला तसेच लहान मुलांनादेखील या केंद्रात क्वारंटाइन करण्यात येते. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या हाय रिस्क तसेच लो रिस्क कॉन्टक्टमधील नागरिकांना या केंद्रात क्वारंटाइन करण्यात येते. त्यांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट येईपर्यंत त्यांचे तेथे विलगीकरण केले जाते. त्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यांना पुढील उपचारांसाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात येते. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना सोडून देण्यात येते.
मोशीतील या केंद्रात मंगळवारपर्यंत २२७ जण क्वारंटाइन होते. त्यातील काही जण शुक्रवारी सायंकाळी, शनिवारी सकाळी येथे दाखल झाले आहेत. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. त्यामुळे ते नागरिक अस्वस्थ झाले. आमचे रिपोर्ट का आले नाहीत, आम्हाला येथे का बंद करून ठेवले आहे, असे म्हणून त्यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात आला. तसेच केंद्राच्या मुख्य दरवाजावर एकत्र आले. आम्हाला बाहेर जाऊ द्या, असे त्यांनी तेथील आरोग्य कर्मचाºयांना सांगितले. त्यावेळी काही जणांनी त्यांच्या मोबाइलमध्ये व्हिडीओ केले. त्यात नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. आम्हाला जाऊ द्या, अन्यथा आम्ही आत्महत्या करू, असेही काही नागरिकांनी आरोग्य कर्मचाºयांना सांगितले. त्याबाबतचे व्हिडीओ व्हायरलदेखील झाले आहेत.
मोशीतील केंद्रात काही जणांना कुटुंबांसह क्वारंटाइन केले आहे. एकट्या असलेल्या महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. सध्या २२७ जण येथे क्वारंटाइन असून, त्यातील काही जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल येण्यास विलंब झाला. क्वारंटाइन नागरिकांना दररोज नाश्ता, दोन वेळा जेवण व चहा, मुलांसाठी दूध दिले जाते. सामाजिक संस्थामार्फतही सुविधाही पुरविण्यात येत आहेत.- डॉ. शैलजा भावसार, वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका
---------क्वारंटाइन सेंटरमधील काही जणांच्या तक्रारी होत्या. खोल्यांमध्ये दररोज नियमित साफसफाई होत नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यांच्या खोल्यांमध्ये पोलिसांनी झाडलोट करून दिली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांना आवश्यक सुविधा पुरविण्यात येतात. - राजेंद्र कुंटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एमआयडीसी-भोसरी.
------------काही खोल्यांमध्ये अस्वच्छता होती. त्यामुळे त्या खोल्यांमधील नागरिकांनी गोंधळ घातला. नंतर खोल्यांमध्ये स्वच्छता करून देण्यात आली. त्यानंतर सर्व शांत झाले. काही जणांचा गैरसमज झाला होता. त्यातून हा प्रकार वाढत गेला. परंतु, त्यामध्ये तथ्य नाही. - एक क्वारंटाइन नागरिक, मोशी केंद्र