पिंपरी : पिंपरीजवळच्या चिखली येथील कुदळवाडीमध्ये भंगार साहित्याच्या गोदामांना लागलेल्या आगीत शंभरावर शेड आणि कामगारांच्या खोल्या जळून खाक झाल्या. सोमवारी (दि.९) सकाळी साडेनऊच्या सुमारास लागलेली आग रात्रीपर्यंत आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. परिसरातील नागरिकांना वेळीच बाहेर काढल्याने जीवितहानी टळली. मात्र, लाखोंचे नुकसान झाले.
शहरातील चिखली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर भंगाराची अनधिकृत गोदामे उभारण्यात आली आहेत. त्यांचे शेड दाटीवाटीने असल्याने येण्या-जाण्यासाठी अरुंद रस्ते आहेत. सोमवारी सकाळी एका शेडमध्ये आग लागली. तेथे ऑइल आणि रसायनांचे डबे असल्याने आग भडकली. काही क्षणात आजूबाजूच्या गोदामांमध्ये ती पसरली. तेथील गॅस सिलिंडरचे स्फोट होऊन आगीचे आणि धुराचे लोट वाढले. काळ्याकुट्ट धुराचे लोट आकाशात उंचापर्यंत पोहोचले होते. आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि गाड्या लागलीच घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांचाही मोठा फौजफाटा दाखल झाला.
गोदामांमध्ये रबर, प्लास्टिक, काच, कापड असे साहित्य असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे ती आटोक्यात आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडील अग्निशमन विभागाच्या २० गाड्या व १० टँकर घटनास्थळी दाखल झाले. आगीची भीषणता पाहून पुणे महापालिका, एमआयडीसी आणि पीएमआरडीएच्या प्रत्येकी २ गाड्या घटनास्थळी बोलावण्यात आल्या. त्यांच्यासह ११० कर्मचारी आग आटोक्यात आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करत होते.
नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
आग लागलेल्या ठिकाणच्या गोदामांशेजारीच रॉयल प्लाझा नावाची गृहनिर्माण सोसायटी आहे. या इमारतीतील नागरिकांना आगीची झळ बसू नये यासाठी इतरत्र हलवण्यात आले. नागरिकांनी गॅस सिलिंडर बाहेर काढून ठेवत घर सोडले. सुरक्षेसाठी परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
पोलिसांचा फौजफाटा
आगीचे लोट पाहून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दोन हजारांहून अधिक बघ्यांची गर्दी होती. त्यामुळे स्थानिक आणि इतर पोलिस ठाण्यांचा तसेच मुख्यालयातील पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.