नारायण बडगुजर
पिंपरी : अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरू केल्यानंतर पोलिसांनी वेश्याव्यवसायाचा देखील पर्दाफाश केला. त्यामुळे यातील दलाल तसेच मुख्य सुत्रधारांच्या मुसक्या आवळून पोलिसांनी पीडित महिलांची सुटका केली. पोलिसांनी २०२१ या वर्षभरात केलेल्या कारवायांमध्ये २२ परदेशी पीडित महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका केली. या महिलांची त्यांच्या मायदेशी रवानगी करण्यात आली. या महिलांना परदेशातून कोण पाठवतो, त्यांना इकडे वेश्याव्यवसायात कोण अडकवतो, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. याची पाळेमुळे परदेशात आहेत का, याचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी शहरवसीयांकडून होत आहे.
शहरातील अवैध धंद्यांवर कारवाईच्या सुचूना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिल्या. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकांसह पोलीस ठाण्यांच्या स्थानिक पोलिसांकडून देखील कारवाईचा धडाका सुरू आहे. शहरातील काही लाॅज, तसेच स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे वर्षभरातील कारवाईवरून समोर आले. वेश्याव्यवसायासाठी काही परदेशी महिलांना प्रवृत्त केल्याचेही यातून समोर आले. पोलिसांनी अशा महिलांची सुटका केली. कायदेशीर कार्यवाही करून त्यांना त्यांच्या मायदेशी पाठविण्यात आले.
मानवी तस्करी?
संयुक्तस राष्ट्र संघाच्या व्याख्येनुसार, एखाद्या व्यक्ती ला बलप्रयोग करून, भीती दाखवून, धोक्याने किंवा हिंसक पद्धतीने, तस्करी किंवा बंधक बनवून ठेवण्याला मानवी तस्करी म्हटले जाते. यामध्ये पीडित व्यक्तीदकडून देहव्यापार, घरगुती काम, गुलामी, त्याच्या मनाविरुद्धचे काम करवून घेतले जाते. शहरात वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आलेल्या परदेशी महिलांना त्यांच्या देशातून भारतात कोणी आणले, त्यासाठी त्यांना कोणी प्रवृत्त केले किंवा आमिष दाखविले, याचा शोध घेण्याचे आव्हान यंत्रणेपुढे आहे.
युगांडा, बांग्लादेश, केनियातील महिलांचा समावेश
शहरात पोलिसांनी विविध भागात केलेल्या कारवाईत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. युगांडा या देशातील १४ महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली. तसेच बांग्लादेशातील सात, केनियातील एक पीडित महिलेची देखील सुटका केली. यातील दोन बांग्लादेशी महिलांकडे कागदपत्रे मिळून आली नाहीत. त्यामुळे त्यांना ब्लॅकलिस्टेड करण्यात आले.
सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्य
सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत परदेशी नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. यातील काही परदेशी महिला वेश्याव्यवसायात असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवईवरून समोर आले आहे. भाडेतत्त्वार घेतलेल्या घरात परदेशी नागरक वास्तव्य करतात. यातील काही परदेशी तरुणी वेश्याव्यवसायात ओढल्या जातात.
समुपदेशनात भाषेचा अडसर
वेश्याव्यवसायातून सुटका केलेल्या परदेशी महिलांना समुदपेदशन केंद्रात ठेवण्यात येते. तेथे मराठी, हिंदी, इंग्रजीतून देखील समुपदेशन केले जाते. मात्र बहुतांश पीडित परदेशी महिलांना या भाषा अवगत नसतात. त्यांना केवळ त्यांच्या देशातील त्यांची बोलीभाषा समजते. त्यामुळे समुपदेनात अडचणी येतात.
दलालांची साखळी
वेश्याव्यवसायात दलालांची मोठी साखळी असल्याचे यावरून दिसून येते. यात स्थानिक तसेच परदेशातील काही व्यक्तींचाही समावेश असू शकतो. वेश्याव्यवसायाची पाळेमुळे खोदून या दलालांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.