लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : संपूर्ण महाराष्ट्रात नोकरीच्या उत्तम संधीसाठी प्रसिद्ध असलेल्या पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक शाखेतील अनामिका कुमारी हिची अडोबी कंपनीमध्ये वार्षिक ११ लाख रुपयांच्या पॅकेजवर निवड केल्याची माहिती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉमन सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता प्रा. शीतलकुमार रवंदळे यांनी दिली.या ट्रस्ट अंतर्गत पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय निगडी, पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र, रावेत, नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालय तळेगाव या तीन महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कॉमन सेंट्रल प्लेसमेंट सेल अंतर्गत मागील आठ वर्षांत सुमारे १६५०० हून जास्त विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यात आली आहे. मागील वर्षी केपीआयटी टेक्नोलॉजी कंपनीत १५५ विद्यार्थ्यांसह एकूण ४५० विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यात यश आले आहे. अनामिका कुमारीने मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार एस. डी. गराडे, विश्वस्त भाईजान काझी, संचालक डॉ. गिरीष देसाई, प्राचार्य डॉ. ए. एम. फुलंबरकर, डॉ. हरीश तिवारी, डॉ. राजेंद्र कानफाडे, प्रा. सौ. राजेश्वरी यांनी अभिनंदन केले. (वा. प्र.)
पीसीईटीच्या अनामिकाला अकरा लाखांचे पॅकेज
By admin | Published: June 10, 2017 2:09 AM