पुणे : नोटबंदीनंतर बाजार सावरला असून, त्याचे प्रतिबिंब सोने खरेदीच्या निमित्ताने मंगळवारी (दि. २८) सराफा बाजारात पाहायला मिळाले. मुहूर्त खरेदी, लग्न समारंभापासून ते गुंतवणुकीसाठी नागरिकांनी सोने खरेदीसाठी गुढी पाडव्याचा दिवस साजरा केला. गेल्या वर्षीपेक्षा सुमारे पंचवीस ते ४० टक्के अधिक खरेदी झाल्याने सराफी व्यवसायिकांनी सांगितले. मात्र, ९८ टक्के नागरिकांनी तब्बल खरेदी रोखीने खरेदी करून कॅशलेस व्यवहाराला बगल दिली असल्याचे स्पष्ट झाले. नोंटबंदीच्या काळात जवळपास दोन महिने बाजारात मंदीसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. त्या नंतर प्रथमच बाजारात मोठ्या प्रमाणावर खरेदी झाल्याचे चित्र दिसत आहे. चांगल्या मॉन्सूनमुळे अर्थचक्राला यंदा चालना मिळाली आहे. गेल्या वर्षी गुढी पाडव्यावर दुष्काळाचे सावट होते. त्यातच अबकारी करावरुन व्यापांऱ्यांनी संप पुकारला असल्याने अनेक दिवस सराफी बाजार देखील बंद होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या खरेदी हंगामाच्या तुलनेत यंदा २५ ते ४० टक्क्यांची अधिक सोन्याची विक्री झाली आहे. सौरभ गाडगीळ म्हणाले, लग्नसराई असल्याने दागिने, मंगळसूत्र, बांगड्यांना अधिक मागणी होती. काहींनी पाडव्याच्या मुहूर्तासाठी आधीच सोने आरक्षित केले होते. मध्यंतरी नोटबंदीच्या काळात अनेकांना सोने खरेदी करता आली नव्हती. त्यामुळे गुंतवणूकदारांनी गुढी पाडव्याचा मुहूर्त साधला. दर वेळी पेक्षा यंदा सोन्याची नाणी अथवा वेढणीला तुलनेने कमी मागणी होती. त्या तुलनेत आता शहरी नागरिकांबरोबरच ग्रामीण भागातून हिरेजडीत दागिन्यांना मागणी चांगली आहे. दरवर्षी हिऱ्यांची बाजारपेठ जवळपास २५ टक्क्यांनी वाढत आहे. यंदा पाऊस चांगला असल्याने, बाजारपेठेतील चलनवलन वाढले आहे. एक वर्ष जर पाऊस चांगला राहिला तर, पुढील दोन वर्षे बाजारपेठेतील वातावरण चांगले राहते. (प्रतिनिधी)फक्त दोन टक्के कॅशलेसनोटबंदीनंतर नागरिकांना ई खरेदीची सवय वाढावी या साठी केंद्रसरकार प्रयत्न करीत आहे. माध्यमांद्वारे देखील त्याची जाहीरात केली जात आहे. मात्र, नागरिकांनी सोने खरेदी करताना तरी रोखीने व्यवहार करणेच पसंत केले. जवळपास ९८ टक्के नागरिकांनी रोखीनेच खरेदी केली. तर उर्वरीत दोन टक्के नागरिकांनी पाच ते ३० हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारासाठी कॅशलेस व्यवहाला पसंती दिली. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदीला पिंपरी-चिंचवडकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे नोटाबंदीचा कोणताही परिणाम जाणवला नाही. ७० टक्के ग्राहकांनी कॅशलेस व्यवहार केले. केवळ छोट्या रकमेच्या खरेदी रोख स्वरुपात झाल्या. उन्हाच्या झळांमुळे दुपारपर्यंत ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडले नाहीत. परंतु, सायंकाळी चारनंतर रात्री उशिरापर्यंत सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होती.- तेजपाल रांका, संचालक रांका ज्वेलर्स, चिंचवड
पाडव्याला रोखीची गुढी उंच...
By admin | Published: March 29, 2017 2:03 AM