देहूगाव : येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने चालविण्यात येत असलेली पाणीपुरवठा योजना शनिवारी, १९ मार्चपर्यंत ताब्यात न घेतल्यास रविवारपासून (दि. २०) पाणी बंद करण्यात येईल. यानंतर उद्भवणाऱ्या समस्येला ग्रामपंचायत जबाबदार राहील, असे कळविले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात देहूकरांच्या पुढे पुन्हा पेच निर्माण झाला आहे. देहूला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. थकीत पाणीबिल असल्याने ही योजना ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावी, असे वारंवार प्राधिकरणाच्या वतीने २८ फेब्रुवारीपासून पाणीपुरवठा बंद करण्यात येत असल्याबाबत कळविले होते. मात्र तुकाराम बीजोत्सव सोहळा यात्रेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याने देहूकरांच्या तोंडचे पाणी पळाले होते. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. दरम्यान, आमदार बाळा भेगडे यांनी मध्यस्थी करून पाणीपुरवठा विभागाचे सचिव संतोषकुमार यांच्याशी संपर्क करून तुकाराम बीज सोहळा होईपर्यंत पाणीपुरवठा सुरू ठेवावा, असा निर्णय घेतला होता. मात्र ६ मार्चच्या संयुक्त बैठकीत झालेल्या निर्णयानुसार ही योजना आणखी तीन महिने जीवन प्राधिकरणाने चालवावी व वसुलीबाबत सक्त कारवाई करावी अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी केली होती. तसा अहवालही सचिवांकडे पाठविला होता. मात्र, या निर्णयाला सचिवांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.(वार्ताहर)२० मार्चपासून पाणी बंदमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अधिकारी एन. एन. भोई यांनी ही योजना १९ मार्च पर्यंत ग्रामपंचायतीने ताब्यात न घेतल्यास २० मार्चपासून पाणीपुरवठा बंद करणार असल्याचे कळविले आहे.
ऐन उन्हाळ्यात देहूकरांपुढे पेच
By admin | Published: March 18, 2017 4:48 AM