पिंपरी चिंचवड, दि. 31 - बोपखेल येथील गणेश नगरमध्ये राहणा-या राजाराम ढेरे यांच्या तीन वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला. घरात मुलाची आजी असल्याने अपहरणकर्त्यांचा डाव फसला. याप्रकरणी ढेरे कुटुंबीयांनी दिघी पोलिसांकडे धाव घेतली मात्र पोलिसांनी प्रकरणाकडे गांभीर्याने न पाहता पुन्हा असा प्रयत्न झाल्यास 100 क्रमांकावर संपर्क साधा, असा सल्ला दिला.
अपहरणाच्या उद्देशाने आलेली अज्ञात व्यक्ती सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पुन्हा त्या व्यक्तीचा बोपखेलमध्ये वावर दिसून आला. त्यामुळे ढोरे कुटुंबीय भयभीत झाले आहे. बोपखेल, गणेश नगर भागातील कॉलनी क्रमांक सातमधील ही घटना आहे. आई वडील सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता एका अनोळखी व्यक्तीनं ढोरे यांच्या घरात प्रवेश केला.
घरात असलेल्या मुलाच्या आजीला म्हणाला, मुलाच्या वडिलांनी त्याला घेऊन येण्यास सांगितले आहे. मात्र आजीने मुलाला घेऊन जाण्यास नकार दिला असता त्या अज्ञातानं मुलाला हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आजी भारती कु-हाडे यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी अपहरणकर्त्यानं धूम ठोकली. याबाबत परिसरात चौकशी केली असता देवकर डेअरी येथील सीसीटीव्हीमध्ये तो व्यक्ती कैद झाला. मात्र तोंड झाकलेले असल्याने त्याला ओळखणे कठीण झाले आहे. सीसीटीव्ही फुटेज घेऊन मुलाचे वडील राजाराम ढेरे दिघी पोलीस चौकीत गेले मात्र तेथे त्यांची तक्रार नोंदवून घेतली गेली नाही फक्त गस्त घालणारे पोलीस ढेरे यांच्या घरी पाठवून विचारपूस करण्यात आली. पुन्हा काही झाले तर 100 नंबरवर संपर्क साधा, असे ढेरेंना सांगण्यात आले. परंतु अशीच घटना 4 दिवसांपूर्वी राम नगर भागात घडली होती त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.