सासवड : जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक पुरंदरमध्ये नुसती गाजत नाही, तर वाजतेय पण. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी प्रचारासाठी गाड्या केल्या असून, त्यावर आपण व आपल्या पक्षाने केलेल्या कामांची गाणी सिनेसंगीतावर वाजविली जात आहेत. विधानसभा निवडणूकप्रसंगी वापरलेले फिल्म दाखविण्याचे तंत्रही वापरले जात आहे. त्यामुळे निवडणूक ग्रामीण भागात चांगलीच वाजत आहे. फ्लेक्सचे प्रमाण कमी आहे. मात्र, जेवणावळी जोरात सुरू आहेत. त्यामुळे केटरर्स व ढाबेमालक-चालकांची चलती आहे. शाकाहारी, मांसाहारी जेवण दिले जात आहे, आचारसंहितेनुसार जाहीर प्रचार रात्री दहा वाजता संपत असला, तरी खरा व्यक्तिगत प्रचार दहानंतरच सुरू होतो. नेतेमंडळी रातोरात फिरत आहेत. मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात रंगत आली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.(वार्ताहर)
टेक्नोसॅव्ही प्रचाराने रंगत
By admin | Published: February 18, 2017 3:15 AM