- योगेश गाडगेदिघी - पालखी सोहळ्यात प्रत्येक जण आपापल्या परीने काहींना काही दान करीत असतो. मात्र भोसरीतील राजश्री जुन्नरकरने आपल्या कलेचे दान माऊली सोहळ्याच्या मार्गावरती देऊ केलयं. अत्यंत कमी वेळेत, कोणतेही साधन न वापरता, कुठलेही प्रशिक्षण न घेता व कुठलेही पाठबळ नसताना राजश्रीने ही कला जोपासली आहे.उभे राहून, बसून अथवा चालत नव्हे तर चक्क धावत जलद व सुबक रांगोळी काढण्यात तिचा हातखंडा आहे. आळंदी ते पंढरपूर या २५० किलोमीटरच्या मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालण्याची तिची अविरत सेवा सुरू आहे.सामाजिक संस्थांकडून मदतसंत ज्ञानेश्वरमहाराजांची व संत सोपानकाकामहाराज पालखी प्रस्थानातही राजश्री दरवर्षीप्रमाणे रांगोळी काढणार असल्याचे सांगते. वारीतील तिची ही अविरत सेवा बघून अनेक सामाजिक संस्था व दानकर्ते मंडळींनी तिला मदत म्हणून दरवर्षी रांगोळी पुरवत असल्याने ती पालखीमार्गावर रांगोळी काढू शकते, असा राजश्री आवर्जून उल्लेख करते. पालखी सोहळ्यात सहभागी होत असल्याने तिची कला आणखी फुलत गेली आहे. पालखी विसावा व मुक्कामाच्या ठिकाणी पालखी तळावर विविध रंगाची रांगोळी राजश्री काढते.वेगवेगळे विषय घेऊन समाजप्रबोधनाचे कार्य करते. यापूर्वी पर्यावरण, लेक वाचवा, महिला सुरक्षा, पाणी वाचवा, पावसाचे आवाहन, स्वच्छ वारी, निर्मल वारी विषयांवर रांगोळी साकारली होती. यंदा प्लॅस्टिकमुक्त वारीचा संदेश रांगोळीच्या माध्यमातून देणार असल्याचे सांगत राजश्रीने वारीचा अनुभव गाठीशी घेत वारीचा प्रवास सुरू केला आहे.1 - सात वर्षांपासून पालखीमार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालत कुटुंबातील सदस्यांसह राजश्री वारी करत आहे. माऊलींच्या पालखी प्रस्थानापासून ते थेट पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सभामंडपापर्यंत तिच्या आकर्षक रांगोळ्या पाहण्याचा मोह आवरता येत नाही. प्रचंड वेगात रांगोळी काढण्याचा तिचा हातखंडा आहे. उभे राहून, बसून अथवा चालत नव्हे तर ती चक्क पळत रांगोळी काढते.2 - महत्त्वाची बाब म्हणजे रांगोळी काढल्यानंतर जे काही शब्द लिहायचे असतात ते ती उलट्या दिशेने लिहिते. तरीही ती अक्षरे रेखीव व सुबक असतात हे तिचे वैशिष्टय. तिची ही कला पाहणारा प्रत्येक जण थक्क होतो. तिच्या हाताखाली रांगोळी पुरविण्यासाठी ३ ते ४ माणसे लागतात. वडील राजेंद्र जुन्नरकर, भाऊ शुभम, रवींद्र जामकर अशी कुटुंबातील सदस्य तिला या वारीत मदत करीत आहेत. पालखीमार्गावरील रांगोळीच्या पायघड्या घालण्यासाठी यावर्षी पांढरी रांगोळी २५ पोती, १४ प्रकारच्या रंगातील १० पोती रांगोळी वापरणार आहे.3 - एक किलोमीटर रांगोळी काढण्यासाठी तिला १५ मिनिटे लागतात. एका अश्व रिंगणाला पूर्ण गोलाकार रांगोळी काढण्यासाठी तिला केवळ १० ते ११ मिनिटे कालावधी लागतो. गुजरात राज्यातील सुरत येथे गणेशोत्सवातील सुरती राजाच्या मिरवणुकीत ‘नॉनस्टॉप’ ११ किलोमीटर रांगोळीच्या पायघड्या घालत राजश्रीने नवा विश्वविक्रम केला आहे. तिच्या या विश्वविक्रमाची गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने नोंद घेतली आहे. तिच्या या विश्वविक्रमामुळे मराठमोळ्या राजश्रीचा डंका जागतिक पातळीवर वाजला आहे. हे विशेष.
पालखीमार्गावर ‘ती’ धावत घालते रांगोळीच्या पायघड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2018 1:30 AM