पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून संत तुकाराममहाराज आणि संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात येते़. ही परंपरा महापालिकेच्या स्थापनेपासून सुरू आहे. दिंडीप्रमुखांना भेट देण्याची परंपरा संस्कृती रक्षणाचे ढोल बडविणाऱ्या सत्ताधारी भाजपाकडून ही परंपरा खंडित केली जात आहे, असे वृत्त प्रकाशित होताच महापौर राहुल जाधव यांनी दखल घेतली आहे. वारी हे महाराष्ट्राचे वैभव आहे. पालखी सोहळ्यांचे स्वागत करणार असल्याचे महापौरांनी सांगितले. संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संत तुकाराममहाराज यांच्या पालख्या पिंपरी-चिंचवड शहरातून जातात. महापालिकेच्या वतीने दिंडीप्रमुखांचा सत्कार करण्यात येतो. या वेळी महापालिकेतर्फे सेवा म्हणून एक भेटवस्तू देण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतरही ताडपत्री खरेदीतील गैरव्यवहाराचे प्रकरण गाजले होते. या दोन्ही प्रकरणांची चौकशी झाल्यानंतर प्रशासकीय दिरंगाईचा फटका सत्ताधाऱ्यांना बसला होता. निविदा पक्रियेतील त्रुटी यामुळे वारीतील भेटवस्तू प्रकरण गाजले होते. चौकशी समितीच्या शिफारशी बासनात मूर्ती आणि ताडपत्री गैरव्यवहार प्रकरण चौकशीसाठी नियुक्त केलेल्या समितीने प्रशासनास काही शिफारशी केल्या होत्या. त्यात वर्षभरातील सण उत्सवांचे नियोजन करावे. वेळापत्रक बनवावे व उत्सवापूर्वी काही महिने अगोदरच निविदा प्रक्रिया राबवावी, अशा सूचना केल्या होत्या. मात्र, या शिफारशी प्रशासनाने बासनात बांधल्या होत्या. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. ‘‘संस्कृती रक्षणाचे ढोल बडविणाऱ्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना वारी परंपरेचा विसर पडला असल्याची टीका विरोधीपक्षाने केली होती. त्यामुळे वारकऱ्यांचे स्वागत आणि भेटवस्तू देण्याची परंपरा यावर्षी खंडित होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. दुसरीकडे विरोधीपक्षनेते दत्ता साने यांनी संस्कृती रक्षणाचे ढोल बडविणाऱ्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना वारी परंपरेचा विसर पडला असला तरी विरोधीपक्षातर्फे स्वागत केले जाणार आहे. परंपरा खंडित केली जाणार नाही.’’ अशी टीका केली होती. प्रशासनाच्या अनियोजनामुळे परंपरेस खोडा बसणार होता. विरोधीपक्षाकडून टीका होऊ लागल्याने महापौर राहुल जाधव यांनी परंपरेप्रमाण पालख्यांचे स्वागत केले जाणार आहे. ...........वारी हे महाराष्ट्राचे वैभव आहे. माऊली आणि तुकोबांच्या पालख्या शहरातून जातात. त्यामुळे सोहळ्याचे स्वागत करण्याची परंपरा खंडित होणार नाही. तसेच महापालिकेच्या वतीने सोहळ्यास विविध मूलभूत सुविधा पुरविण्याचे कामही केले जाणार आहे. याबाबत प्रशासनास सूचनाही केल्या आहेत.- राहुल जाधव, महापौर