अंकुश जगताप, पिंपरीपरिसरातील स्वच्छता कायम ठेवण्यासाठी बहुतेक पोलीस ठाण्यांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांची रितसर नेमणूकच नाही. त्यातच सफाई अभियानासाठी प्रशासनाकडून खर्चाची तरतुदही नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. परिणामी आपल्या ठाण्यांची स्वच्छता कायम ठेवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनाच खिशाला चाट देत खर्चाची तजवीज करावी लागत आहे. एकीकडे देश तसेच, राज्यात स्वच्छता अभियानाचा गवगवा सुरू असताना या प्रकाराबाबत पोलीस कर्मचाऱ्यांमधूनच नाराजी व्यक्त होत आहे. परिमंडळ ३ च्या अखत्यारीत पिंपरी - चिंचवड व परिसरात पिंपरी, चिंचवड, निगडी, हिंजवडी, वाकड, सांगवी, भोसरी, एम.आय.डी.सी ही पोलीस ठाणी आहेत. या सर्वच ठाण्यांच्या इमारती तसेच, आवाराचा आवाका मोठा आहे. नागरिकांचा नेहमी राबता असल्याने ठाण्याच्या इमारतीमध्ये प्रत्येक अधिकाऱ्यांचे दालन, त्यामधील फर्निचर, कैद्यांची कोठडी, नागरिकांसाठीच्या तक्रार कक्षाची नित्याने स्वच्छता करण्याची गरज असते. त्यासाठी आधी कचरा झाडुन घेणे, निर्जंतुकीकरणासाठी जंतनाशक टाकून फरशा स्वच्छ करण्याची गरज असते. याचबरोबर इमारतीच्या आवातरात साचलेला पालापाचोळा, धुळ, मातीची वेळोवेळी साफसफाई वेळच्यावेळी करावी लागते. प्रशासनाच्या इतर कार्यालयांमध्ये स्वच्छतेसाठी सेवेत कायम कर्मचाऱ्यांची व्यवस्था असते. मात्र बहुतेक पोलीस ठाण्यांमध्ये अशा कर्मचाऱ्यांची नेमणूक अद्याप झालेली नाही. परिणामी सफाईचे काम एखाद्या खासगी मजूराकडून करून घ्यावे लागते. त्यासाठी शासनाकडून पैसेही मिळत नसल्याने बहुदा वरिष्ठ पोलीस निरीक्षकच स्व:ताच्या खिशातून या मजूरांना पैसे देत असतात. काही प्रसंगी साहेबाला पैसे देण्यास कसे सांगावे या विचाराने पोलीस कर्मचारीच ही झळ सोसतात. अनेकदा सेवाभावी वृत्तीने काही लोकही सफाईचा खर्च सोसण्याची तयारी दाखवितात. काही ठाण्यांमध्ये तसेच, वरिष्ठ कार्यालयांमध्ये चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली असते. मात्र बहुदा तेथेही बाहेरील मजूरांकडून कामे करवून घेतली जाण्याचे प्रसंग उद्भवतात. आफिसबॉयचे काम करण्यासाठी हंगामी कामगारांची तजवीज असते.
स्वच्छतेसाठी पोलिसांची पदरमोड
By admin | Published: January 31, 2015 1:30 AM